बेळगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण
गर्भवती महिलेला लागण : आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याची सूचना : नागरिकांनी मास्कचा वापर करावा
बेळगाव : संपूर्ण देशभर कोविडचे पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत. बेळगावमध्ये कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. एका 25 वर्षीय गर्भवती महिलेला कोविडची लागण झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी बाळगून अधिकाधिक मास्कचा वापर करावा, अशी सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी आय. पी. गडाद यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
2020 व 2021 मध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला होता. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या नव्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, बेंगळूर अशा मोठ्या महानगरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच बेळगावमधील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या महिलेने इतर शहरातून प्रवास केला असावा, अशी शक्यता आहे. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांनी आपण कुठे प्रवास केला नसल्याचे डॉक्टरांना सांगितले.
नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे
ज्या गावातील ही महिला आहे, त्या गावात त्यांच्या आसपासचे नागरिक, त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून कोरोनाचे संक्रमण होणार नाही, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क, तसेच इतर गोष्टींचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने त्या गावातील 266 घरांना भेटी देऊन तेथे तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
आधी कोरोनाची भीती सोडा : वैद्यकीय सूचनांची अंमलबजावणी करा
बेळगाव : चार वर्षापूर्वी भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. 30 जानेवारी 2020 मध्ये केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. हळूहळू संसर्ग वाढत गेला. आणि केरळमध्ये 23 मार्चला आणि संपूर्ण देशामध्ये 25 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. कोरोनाच्या या संसर्गाचा तेव्हा लोकांनी धसका घेतला होता. परंतु हळूहळू संसर्ग कमी होऊन कोरोना आटोक्यात आला. पुन्हा नव्याने कोरोनाचा(ओमिक्रॉन) संथगतीने शिरकाव झाला आहे. याची लक्षणे सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही. तथापि सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. याच संदर्भात तज्ञांनीसुद्धा कोरोनाची लक्षणे सौम्य असून, लोकांनी घाबरुन जाऊ नयेत, असे सांगत दिलासा दिला आहे. कोरोनाचा शिरकाव सुरू झाला म्हणून घाबरुन जाण्याचे कारण नाही. आधी कोरोनाची भीती आपण सोडली पाहिजे, फक्त योग्य त्या वैद्यकीय सूचनांची अंमलबजावणी करून पूर्वीप्रमाणेच नियमांचे पालन करून काळजी घ्यायला हवी.
‘कोरोना ओमिक्रॉन जे 13’ विषाणू पूर्वी इतका तीव्र नाही
‘कोरोना ओमिक्रॉन जे 13’ हा विषाणू पूर्वी इतका तीव्र नाही. तथापि, काळजी मात्र घेणे आवश्यक आहे. जर सर्दी, खोकला, कफ, अशी लक्षणे आढळल्यास, धाप लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांना आपली प्रकृती दाखवून ते सांगतात त्या सूचनांचे पालन करा. प्रामुख्याने वृद्ध, गर्भवती आणि लहान मुले यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पूर्वीप्रमाणे मास्क वापरा, हात आणि पाय वारंवार धुण्याची सवय ठेवा. बाहेरचे पदार्थ टाळा, शक्यतो तेलकट पदार्थ वर्ज्य करा, जर तेलकट पदार्थ खाल्ले गेले तर लगेच गरम पाणी प्या. शक्यतो गर्दीमध्ये जाण्याचे टाळा. जाणे अपरिहार्य असेल तर मास्क वापरा, याशिवाय सामाजिक अंतर ठेवा.
-डॉ. गुरुराज एम. उडचणकर एमबीबीएस, एमडी, डीटीसीडी, ईडीआरएम, पीजीडीएमएलई युरोपियन डिप्लोमॅट इन रेस्पिरेटरी, मेडिसीन, इंटरव्हेन्शंनल पलमोनॉलॉजीस्ट, (अरिहंत हॉस्पिटल)
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभागाची व्यवस्था
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या भविष्यात वाढल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. दहा बेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर सरकारी हॉस्पिटलमध्येही गरज भासल्यास स्वतंत्र विभाग सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे. त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणीला सोमवारपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे.
खबरदारी कशी घ्यावी?
- नागरिकांनी मास्कचा अधिकाधिक वापर करावा
- गर्दीच्या ठिकाणी, समारंभांना जाणे टाळावे
- गर्भवती महिला, मधुमेही व्यक्ती, वयोवृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
- लक्षणे आढळल्यास सरकारी हॉस्पिटलशी संपर्क साधा.
तुर्तास चेकपोस्ट उभारण्याची गरज नाही
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने सीमाहद्दींवर चेकपोस्ट उभे करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आरोग्य अधिकारी म्हणाले, सध्या चिंताजनक अशी परिस्थिती नाही. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून चेकपोस्ट उभारण्याबाबत निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या चेकपोस्ट उभारण्याची आवश्यकता नाही. भविष्यात गरज भासली तर चेकपोस्ट उभारू, असे त्यांनी सांगितले.
...तर डॉक्टरांना केंद्रात हजर राहण्याचा आदेश देऊ-जिल्हाधिकारी
कोरोनाचा सौम्य प्रमाणातील शिरकावसुद्धा नागरिकांमध्ये काळजी किंवा भीती निर्माण करू शकतो, त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निर्धारित वेळेनुसार डॉक्टर उपलब्ध असतातच असे नाही, शिवाय तेथे माहिती देणारेही कोणी नसते. हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच आपण आरोग्याधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना केंद्रात हजर राहण्याचा आदेश देऊ, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून धोकादायक म्हणून वर्गीकृत नाही
नव्याने शिरकाव झालेल्या कोरोनाची बिलकूल भीती बाळगण्याची गरज नाही. कोविड व्हेरिऐंटस् (कोविडचे प्रकार) नियमितपणे येत राहतील. मात्र त्यांच्या अनुवंशिकतेमध्ये काही फरक असेल. कोविडच्या केसिसमध्ये अलीकडच्या काळात झालेली वाढ ही जेएन1 या ओमिक्रॉनच्या उपप्रकारामुळे झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने त्याला धोकादायक म्हणून वर्गीकृत केलेले नाही. या कोविडची लक्षणे सौम्य असतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. ताप, सर्दी, खोकला असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे, शिवाय मधुमेहींनी आपली औषधे नियमितपणे घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, श्वासोच्छवास करण्यास समस्या आल्यास मात्र त्वरित डॉक्टरांकडे जावे.
डॉ. मंजुनाथ गोरोशी -मधुमेह तज्ञ,एमडी, डीएम,एन्डोक्रोनोलॉजी, असोसिएटेट, प्रोफेसर केएलई हॉस्पिटल
कोरोनाची भीती बाळगू नका
लोकांनी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. कोणीही पॅनिक (अस्वस्थ) होऊ नये, ज्यांना ताप आला आहे अशा लोकांचे सर्वेक्षण करण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून औषध घ्या, आणि शक्यतो घरामध्ये आयसोलेटेड (विलगीकरण) व्हा.
- जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

