‘हवाई दल’ महिला अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेत
सांबरा हवाई दल प्रशिक्षण केंद्रात महिला-पुरुष अग्निवीरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
कठोर परिश्रम, शिस्त, चिकाटी यांचे सातत्यपूर्ण प्रदर्शन घडवत अग्निवीर प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रथमच अग्निवीर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून देशाच्या इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याजोगा आहे. हवाई दलाने या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उदाहरण घालून दिले आहे. असे प्रशिक्षण पूर्ण करणारी देशातील ही पहिलीच तुकडी बेळगावच्या हवाई प्रशिक्षण केंद्रातून देशसेवेसाठी कटिबद्ध झाली आहे हे विशेष होय, अशा शब्दात एअर मार्शल आर. राधीश (एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ, ट्रेनिंग कमांड, आयएएफ) यांनी अग्निवीर प्रशिक्षणार्थींची प्रशंसा केली.
केंद्र सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या महिला-पुरुष अग्निवीर यांचा दीक्षांत समारंभ शनिवारी सकाळी सांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्रामध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी उघड्या जीपमधून त्यांनी परेडचे परीक्षण केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींनी शिस्तबद्ध पद्धतीने शानदार पथसंचलन करून त्यांना मानवंदना दिली. या मार्चिंगचे नेतृत्व दिव्यांशी साहू हिने केले.
ते पुढे म्हणाले, या अग्निवीरांना अत्यंत कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागले. मात्र नेतृत्व, देशभक्ती, कर्तव्य कठोरता यांचे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास आणि सहनशीलता वाढली आहे. या अग्निवीरांचे प्रशिक्षण हे पुढील सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या दिवसापासून आजपर्यंतच्या कठोर प्रशिक्षणामुळे या अग्निवीरांमध्ये लक्षणीय परिवर्तन झाले आहे. कसोटीच्या प्रत्येक टप्प्यावर ते पूर्णपणे खरे उतरले आहेत. या अग्निवीरांनी हाच दर्जा आपल्या पुढील आयुष्यातही कायम ठेवावा आणि देशसेवेसाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर विविध प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये उत्तम कामगिरी बजावलेल्या अग्निवीर भरत सिंग, विजय पानसिंग, किरण यांना व सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अमर बहाद्दूर यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
ग्रुप कॅप्टन त्रिलोक शर्मा यांनी अग्निवीर प्रशिक्षणाचा अहवाल सादर केला. प्रथमच महिला अग्निवीरांना संधी देण्यात आली. 3 जुलै 2023 मध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. 153 महिला अग्निवीरांसह एकूण 2280 अग्निवीरांनी लक्षणीय कामगिरी बजावत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 8 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या वायुसेना परेडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. याशिवाय दिल्ली येथे झालेल्या पथसंचलनातही त्या सहभागी झाल्या होत्या. युद्ध कौशल्यासह मार्शल आर्ट, प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणे यासह अनेक तऱ्हेचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले, असे ते म्हणाले. सोहळ्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या व कुटुंबीय भेटल्याच्या आनंदात अग्निवीरांनी हवेत टोप्या उडवून आनंद व्यक्त केला.
ग्रुप कॅप्टन त्रिलोक शर्मा (मुख्य प्रशिक्षक)
आजचा दिवस हा वायु दलासाठी आणि वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी अत्यंत स्मरणीय व महत्त्वाचा आहे. अग्निवीरसाठी दाखल झालेल्या तरुणींनी अत्यंत उत्कृष्ट असे निकाल दिले आहेत. परेड, धावणे, अडथळ्यांच्या शर्यती यामध्ये मुली मुलांच्या बरोबरीने पुढे आल्या आहेत. महिला हे समाजाचे निम्मे बळ आहे. त्याला आज समाजाच्या विकासामध्ये आपण भागीदार करून घेत आहोत, ही फार मोठी घटना आहे.
विनय (अग्निवीर)
मी हरियाणाहून आलो आहे. मला सैनिक व्हायचे आहे. या ठिकाणी आल्यामुळे अतिशय अनुभवी अशा अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण लाभले. मुख्य म्हणजे यापूर्वी माझ्यामध्ये शिस्तीचा अभाव होता, ती शिस्त मी येथे शिकलो आहे. पुढेही ती माझ्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
मोनिका (अग्निवीर)
मी राजस्थानहून आले असून प्रारंभी प्रशिक्षणाचे स्वरुप पाहून आपण हे पूर्ण करू शकणार का? अशी शंका आली होती. कुटुंबीयांची आठवणही येत होती. वेळेचे व्यवस्थापन माहीत नव्हते. मात्र, प्रशिक्षणामुळे वेळेचे व्यवस्थापन शिकले आणि एखादी मोहीम फत्ते कशी करायची? याचे धडेही मिळाले.
आयुषी गुप्ता (अग्निवीर)
येथे येण्यापूर्वीच्या आम्ही आणि आताच्या आम्ही यामध्ये लक्षणीय फरक पडला आहे. एका सुरक्षित वातावरणातून वेगळ्याच वातावरणात आम्ही आलो. परंतु, प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास बळावला आहे. ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे.
►देशातील पहिल्या महिला अग्निवीर तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
►बेळगावच्या सांबरा येथील हवाई प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण
►एकूण 154 महिला अग्निवीर
►22 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण
►सर्व महिला अग्निवीर परीक्षांमध्ये उत्तीर्ण
►दीक्षांत समारंभास अग्निवीरांचे पालक व कुटुंबीय उपस्थित