For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आधी पावसाची प्रतीक्षा... आता अतिपावसाने हैराण

03:03 PM May 27, 2025 IST | Radhika Patil
आधी पावसाची प्रतीक्षा    आता अतिपावसाने हैराण
Advertisement

सावळज :

Advertisement

उन्हाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तासगाव पुर्व भागात पाऊस कधी पडणार...? म्हणणारे आठ दिवसातच पाऊस कधी थांबणार..? असा सवाल उपस्थित करीत आहेत. परिसरात अद्याप खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. परिसरातील पावसाच्या सातत्यामुळे उन्हाळ्यातच पाऊस नकोसा झाला आहे. त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहे.

उन्हाच्या तीव्रतेने परिसरात पाणी टंचाईच्या काही ठिकाणी झळा बसू लागल्या होत्या. त्यामुळे टंचाईग्रस्त शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. मात्र मे महिन्याच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर विहिरी व कुपनलिकातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच सततच्या पावसामुळे पावसाळ्यागत स्थिती निर्माण झाल्याने शेतीचे कामे खोळंबली आहेत.

Advertisement

  • मशागतीची कामे खोळंबली

खरीपाच्या तयारीसाठी बळीराजाने मशागतीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. व सातत्याने पाऊस सुरू असुन शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीची नांगरणी, कोळपणी, फण मारणे, शेणखत मिसळणे यासह इतर कामे ही खोळंबली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी शेतांना वापसा आल्याशिवाय शेतीचे कामे करणे अशक्य असल्याने शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे.

  • परिसरात पावसाचा कहर

तासगाव पूर्व भागात यावर्षी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधारेमुळे शेतांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. तर अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटून नुकसान झाले आहे. तर परिसरातील बंधारे भरून वाहू लागले आहेत. रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात पाय ठेवणे मुश्किल झाले आहे. मात्र पाणी टंचाईतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.

  • पावसामुळे द्राक्ष शेती धोक्यात

मे महिन्याच्या सुरुवातीला पाण्याअभावी संकटात सापडलेली द्राक्षशेती सध्या अतिपावसामुळे अडचणीत आली आहे. द्राक्ष शेतीत पाणी साचून राहिले आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी अडचणी येत आहेत. फवारणी ट्रॅक्टर बागेतील चिखलात अडकून पडत आहेत. द्राक्षवेलींवर वेळेत औषध फवारणी होत नसल्याने द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. मशागतीच्या कामे कामे खोळंबल्याने शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करीत आहे.

Advertisement
Tags :

.