पोलीस रेकॉर्डवरील युवकावर गोळीबार
गणेशपूर येथे गुरुवारी रात्री 2.30 वाजता हल्ला, युवक गंभीर जखमी : कुटुंबीयांचा तिघांवर संशय
बेळगाव : मध्यरात्री आपल्या कारमधून घरी येणाऱ्या रौडीशिटरवर गोळीबार करण्यात आला आहे. हिंदूनगर, गणेशपूरजवळ ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. गोळीबारात कारच्या काचा फुटल्या असून युवक जखमी झाला आहे. गोळीबार कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. प्रफुल्ल बाळकृष्ण पाटील (वय 30) रा. शाहूनगर असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. जखमी अवस्थेतच त्याने आपली कार खासगी इस्पितळापर्यंत आणली व स्वत: इस्पितळात दाखल झाला. या घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बेळगुंदी रोडवरून टीएन 12 बीडी 7365 या कारमधून प्रफुल्ल आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार झाला आहे. अज्ञातांनी प्रफुल्लच्या कारवर दोन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून गोळीबारानंतर कारच्या काचा फुटल्या आहेत. गेल्यावर्षी 30 मार्च 2024 रोजी प्रफुल्लला तडीपारही करण्यात आले होते. या घटनेनंतर प्रफुल्लने स्वत: आपली कार चालवत इस्पितळ गाठले. खासगी इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी इस्पितळाला भेट देऊन कारची पाहणी केली. विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. कारच्या काचा कशामुळे फुटल्या? याची माहिती मिळविण्यात आली.
जखमी प्रफुल्ल हा रौडीशिटर होता. त्यामुळे त्याच्यावर नेमका गोळीबार कोणी केला? याची माहिती मिळविण्यात येत आहे. खडेबाजार, बेळगाव ग्रामीणसह वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये प्रफुल्लवर एफआयआर नोंद आहेत. गेल्यावर्षी 16 जून रोजी राजू कडोलकर (वय 53) याच्यावर बाचीजवळ चाकूहल्ला केल्याच्या आरोपावरून प्रफुल्लसह चौघा जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्याचदिवशी एफआयआर दाखल करण्यात आला होता. चाकूहल्ल्यानंतर फरारी झालेल्या प्रफुल्लला 29 जून 2024 रोजी मुंबईत अटक करण्यात आली होती. आता प्रफुल्लवरच गोळीबार झाला आहे. यासंबंधी पत्रकारांना माहिती देताना पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग म्हणाले, प्रफुल्ल हा रियल इस्टेट व्यावसायिक आहे. त्याच्यावर कोणी हल्ला केला, याची माहिती मिळविण्यात येत आहे. सर्व शक्यता पडताळून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
कुटुंबीयांचा तिघा जणांवर संशय
गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील विविध गटांचा संघर्ष सुरूच आहे. हा संघर्ष कशासाठी आहे, याची संपूर्ण माहिती पोलीस दलाला आहे. तरीही स्वत:च्या फायद्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी या संघर्षाकडे दुर्लक्षच केले. आता हा संघर्ष गेल्या सहा महिन्यांपासून जीवघेणा ठरतो आहे. जखमी प्रफुल्लवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याच्यावर गोळीबार कोणी केला? याची माहिती मिळविणे पोलिसांना शक्य झाले नाही. मात्र, कुटुंबीयांनी तिघा जणांवर संशय व्यक्त केला असून त्यांची चौकशी करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. यासंबंधी रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.