तवंदी घाटात मालवाहू ट्रक उलटला, चालक गंभीर
पाच लाख रुपयांचे नुकसान
वार्ताहर/तवंदी
तवंदी घाटात अवघड वळणावर मालवाहू ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चालक वसंत पुजारी (वय 40, मूळगाव कंकणवाडी, सध्या रा. तोपिनकट्टी, ता. रामदुर्ग) हा गंभीर जखमी झाला. यात वाहनाचे 5 लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. सदर मालवाहू ट्रक यादवाडहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान, तवंदी घाटात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकाला धडक देत विरुद्ध दिशेला जाऊन उलटला. या अपघातामध्ये ट्रक चालक वसंत पुजारी हा ट्रकमध्येच अडकून पडला होता. त्याला नागरिकांनी, तसेच अवताडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. त्यानंतर त्याला अवताडे कंपनीच्या रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ट्रक क्लिनर रमेश हाळी (वय 40, रा. मुधोळ) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.