महांतेशनगर येथे युवकावर गोळीबार
वाढत्या गुन्हेगारीने बेळगावकर हैराण
बेळगाव : महांतेशनगर येथे एका युवकावर गोळीबार झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा केएमएफ डेअरीजवळ ही घटना घडली असून दोन गोळ्या लागल्याने युवक जखमी झाला आहे. जीपमधून मित्राच्या घरी जेवणाला गेले असता ही घटना घडली आहे. प्रणितकुमार (वय 31) असे जखमी युवकाचे नाव असून तो टिळकवाडी येथील राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी रात्री 9.30 ते 10 यावेळेत ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त येडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. जखमी प्रणितकुमारला सिव्हिल
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पोलीस आयुक्तांनी जखमी युवकाकडून घटनेसंबंधी माहिती घेतली. गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. उपलब्ध माहितीनुसार प्रणीतकुमार हा आपल्या मित्राच्या घरी जेवणाला गेला होता. याच ठिकाणी त्याच्या मैत्रिनीलाही बोलावून घेण्यात आले होते. थोड्यावेळेत मैत्रिणीशी संबंधित तिघेजण तेथे आले. त्यांनी गोळीबार केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. आपल्यावर गोळ्या कोणी झाडल्या? यांची नावे आपल्याला माहिती आहेत. मात्र आपण ती सांगणार नाही, असे जखमी युवकाने सांगितले. त्याने आपल्या सोबत दोन पुंगळ्याही आणल्या होत्या.