For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळच्या मंदिरात फटाक्यांचा स्फोट

06:38 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
केरळच्या मंदिरात फटाक्यांचा स्फोट
Advertisement

150 हून अधिक भाविक जखमी : अपघाताच्या चौकशीचा सरकारकडून आदेश

Advertisement

वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम

केरळ राज्याच्या कासरगोड जिल्ह्यातील नीलेश्वरम येथे असणाऱ्या प्रसिद्ध थिरु अंजूतमबालम वीरेरकावू मंदिरात फटाक्यांचा भीषण स्फोट झाल्याने 150 हून अधिक भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मंदिरात मंगळवारी वेल्लातम थेय्याम हा उत्सव साजरा होत असताना दुपारी 12.20 च्या आसपास ही घटना घडली. या उत्सवाच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी केली जात असताना फटाक्यांच्या साठ्याला आग लावून हा स्फोट झाला.

Advertisement

स्फोटाचे वृत्त कळताच आपत्कालीन साहाय्य पथकांना मंदिरात पाठविण्यात आले. किरकोळ जखमींवर कासरगोडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. गंभीर जखमी भाविकांना मंगळूर आणि कान्नूर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. जखमींपैकी किमान आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कासरगोड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

घातपाताची शक्यता धूसर

हा स्फोट अपघातानेच घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. प्रशासनाने आतापर्यंत तरी घातपाताची शक्यता नाकारली आहे. या घटनेच्या चौकशीचा आदेश केरळच्या राज्य सरकारने दिला असून सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. थेय्याम हा उत्सव पाहण्यात दंग असणाऱ्या भाविकांमध्ये अचानक घडलेल्या या स्फोटामुळे काहीकाळ घबराट पसरली. लोकांनी उत्सव स्थानापासून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने काहीकाळ चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी झाले.

घटना घडली कशी...

थेय्याम उत्सव साजरा होत असताना नेहमीच्या परंपरेप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. पेटलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या उडाल्याने जवळ असलेल्या फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट झाला. साठ्याजवळ थांबलेले अनेक भाविक स्फोटाच्या दणक्यामुळे गंभीर जखमी झाले. दूर उभ्या असणाऱ्या भाविकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवळपास 60 लोकांना प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी जाऊ देण्यात आले. गंभीर रुग्णांपैकी 19 जणांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले असून काही गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. फटाक्यांचा साठा एका अस्थायी राहुटीमध्ये ठेवण्यात आला होता. त्यावर ठिणग्या पडल्याने त्याने पेट घेतला, असे प्रथमदर्शनी दिसून आले.

परिसराला पोलिसांचे कडे

घटना घडल्यानंतर त्वरित तेथून सर्व भाविकांना बाहेर काढण्यात आले. उत्सव पाहण्यासाठी 20 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. घटना घडल्यानंतर या संपूर्ण परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांची अनेक पथके घटनास्थळी आणण्यात आली असून जवळपासच्या शहरांमधून अग्निशमन दलाच्या पथकांना बोलाविण्यात आले होते. त्वरित बचाव कार्याचा प्रारंभ केल्याने आग पसरली नाही. तसेच मोठ्या प्रमाणात हानी झाली नाही, अशी माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट  देऊन बचाव कार्याची पाहणी केली. काही तासांमध्ये परिस्थिती मूळ पदावर आणण्यात स्थानिक प्रशासनाने यश मिळविले, अशी माहिती देण्यात आली.

स्थानिकांचे साहाय्य

आपदा निवारण कार्यात या मंदिरानजीक राहणाऱ्या स्थानिकांनीही मोठे साहाय्य केले. घटनास्थळातून लोकांना बाहेर काढणे, जखमींना रुग्णालयात नेणे, घटनास्थळी अडकलेल्या भाविकांना पाणी देणे अशी अनेक छोटीमोठी कामे स्थानिकांनी  स्वत:हून पुढे येऊन केली, अशी भलावण करण्यात आली आहे.

भीषण स्फोटाने परिसराला हादरा...!

ड अंजूतलमबालम मंदिर परिसराला फटाक्यांच्या स्फोटाचा जबर हादरा

ड आतापर्यंत जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी परिसरात घबराट

ड त्वरित आपदा निवारण कार्याला प्रारंभ केल्याने अनेकजण बचावले

ड जखमींपैकी अनेकांवर आसपासच्या रुग्णालयांमध्ये उपचार

Advertisement
Tags :

.