Fire News : गॅरेजला लागलेल्या आगीत वाहने जळून खाक, 15 लाखांचं नुकसान
या आगीत दुरुस्तीसाठी आलेली चार चाकी व दुचाकी जळून खाक
इस्लामपूर : येथील नेहरुनगर मधील योगेश विलास सूर्यवंशी (वय 40) यांच्या गॅरेज व घराला आग लागून सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाले. या आगीत दुरुस्तीसाठी आलेली चार चाकी व दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजता घडली.
नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र हाकेच्या अंतरावर असूनही बंब वेळेत न पोहोचल्याने घर व गॅरेजमधील काहीच उरले नाही. सूर्यवंशी यांचे रहाते घर व गॅरेज लागून आहे. सूर्यवंशी हे रात्री जेवण करुन पत्नी व मुलासह झोपी गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना वाहनाचे टायर फुटल्याचा आवाज आला. त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबाने बाहेर धाव घेतली.
उत्तरेच्या बाजूस लावलेल्या एका दुचाकीस आग लागली होती. या दुचाकीला लागूनच अन्य चार चाकी व दुचाकी वाहने उभी होती. त्यांनी घरातील पाण्याने दुचाकीची आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. घटनास्थळापासून नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र जवळच आहे. सूर्यवंशी हे स्वत: केंद्रात धावत गेले. पण तिथे कुणीच नव्हते, असे त्यांनी सांगितले.
संबंधित विभाग प्रमुख व कर्मचारी यांना फोन करुन बोलावून घेतले. सुमारे अर्ध्या तासाने बंब घटनास्थळी पोहोचला. पण तो पाण्याने अर्धाच भरलेला होता. अशातच हा बंब पडला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग पसरत गेली. काही वेळाने आग गॅरेज व घरात मोर्चा वळवला. धान्य, कपडे, भांडी, टी. व्ही, फ्रीज, पिठाची गिरणींसह गॅरेजमधील एअर कॉम्प्रेसर, ऑईल जॉक, गिअर गाडा, स्पेअर पार्टसही जळाले.
दुरुस्तीसाठी आलेली वाहने जळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. अपघात की घातपात? सर्व प्रथम कमी उंचीच्या असणाऱ्या कंपाऊंडच्या बाजूस पार्क केलेल्या दुचाकीस आग लागली. रात्रीच्या सुमारास अचानक दुचाकीने पेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा अपघात की घातपात याबाबत लोकांत चर्चा सुरु होती.
या आगीमध्ये बाहेरील सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत मारुती कार क्र. एम. एच. 12-टी-1024, बोलेरो गाडी क्र. एम. एच. 09-बीबी-5272, सफारी गाडी क्र. एम. एच. 12-बीव्ही-4608, टेम्पो 407 क्र. एम. एच.-12-जी. टी- 9625, दुचाकी क्र. एम. एच. 10-ए. डी.-6877, दुचाकी क्र. एम. एच. 50-पी.-4728 ही वाहने खाक झाली.
अग्निशमन विभागाची बेफिकीर हाकेच्या अंतरावर लागलेली आग अ ग्नशमन विभागास रोखता आली नाही. सुमारे अर्ध्या तासाने बंब पोहोचला, तोही अर्धे पाणी घेवून. दरम्यान बंब बंद पडल्याने वेळेत मदत मिळू शकली नाही. पालिकेच्या अग्निशमन विभागाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.