उत्तराखंडच्या जंगलात अग्नितांडव
4 दिवसांपासून 11 जिल्ह्यातील 1,780 एकर जंगल प्रभावित : लष्कर, हवाई दलाकडून मदतकार्य
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील भीमतालनजिकच्या जंगलात गेल्या 4 दिवसांपासून लागलेली आग आटोक्मयाबाहेर गेली आहे. गढवाल आणि कुमाऊं विभागातील 11 जिह्यांमध्ये याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. नैनिताल, भीमताल, रानीखेत, अल्मोडा यासह संपूर्ण कुमाऊंमधील जंगलभाग जळत आहे. गढवाल विभागातील पौरी, ऊद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, टिहरी येथेही आगीच्या घटना नोंद झाल्या आहेत.
नैनितालच्या जंगलात लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले आहे. जिल्हा मुख्यालयाजवळील जंगलातील आगीच्या ज्वाळा नैनितालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत. चार दिवसांपूर्वी लागलेली ही आग विझवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुमखाल शहराजवळील जंगलाला लागलेली आग इतकी भीषण बनली होती की, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयातून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रस्ता ओलांडण्याचे धाडस करता आले नाही. सुमारे तासभर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती.
26 एप्रिल रोजी उत्तराखंडमध्ये आगीच्या 31 मोठ्या घटना घडल्या. गढवाल विभागातील चमोली, ऊद्रप्रयाग उत्तरकाशी, पौरी आणि टिहरीची जंगले सर्वाधिक प्रभावित आहेत. आतापर्यंत 1,780 एकर क्षेत्रातील जंगल प्रभावित झाल्याची माहिती देण्यात आली. याठिकाणी महाकाय झाडे असल्याने व पाण्याच्या उपलब्धतेत अडचण असल्याने आग विझवण्यात लोकांना मोठ्या अडचणी येत आहेत. फॉरेस्ट फायर क्रू स्टेशन आणि मोबाईल क्रू स्टेशनद्वारे जंगलातील आगीवर देखरेख ठेवली जात आहे. याशिवाय सर्वच रेंजमध्ये सॅटेलाईट, पॅमेरे, दुर्बिणीच्या माध्यमातून गुन्हेगारांना पकडण्याचे काम विशेष पथकाकडून केले जात आहे.
आतापर्यंत 3 जणांना अटक
ऊद्रप्रयागमधून जंगलात आग लावणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नरेश भट्ट, हेमंत सिंह आणि भगवती लाल अशी त्यांची नावे आहेत. सध्या तिघांचीही तुऊंगात रवानगी करण्यात आली आहे. शेळ्यांसाठी नवीन गवत वाढावे म्हणून त्याने जंगलाला आग लावल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. आतापर्यंत पोलिसांनी जाळपोळीचे 19 गुन्हे दाखल केले आहेत. जंगलातील आग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमने ही कारवाई केल्याचे ऊद्रप्रयागचे विभागीय वन अधिकारी अभिमन्यू यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता हल्दवानी येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. धामी यांनी प्रशासनाला सतर्क राहून जंगलातील आग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. जंगलाला लागलेली आग आमच्यासाठी एक आव्हान आहे. ही मोठी आग आहे. आम्ही सर्व उपययोजना करत आहोत. हवाई दल आणि लष्कराची मदत मागितली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगीमुळे नैनीतालमधील प्रशासनाने नैनी तलावात नौकाविहारावर बंदी घातली आहे. आग विझवण्यासाठी नैनितालहून पाणी नेले जात असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे नैनिताल महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी राहुल आनंद यांनी सांगितले.