For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जकार्तामध्ये सातमजली इमारतीला आग , 20 ठार

06:17 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
जकार्तामध्ये सातमजली इमारतीला आग   20 ठार
Advertisement

इंडोनेशियाच्या राजधानीत भीषण आग : मृतांची संख्या वाढण्याची भीती

Advertisement

वृत्तसंस्था/ जकार्ता

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या केमायोरन भागात मंगळवारी दुपारी एका सातमजली ऑफिस इमारतीला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत कमीतकमी 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आगीदरम्यान इमारतीत अनेक जण अडकून पडल्याची भीती व्यक्त होतेय.

Advertisement

आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून इमारतीच्या आत शोध घेतला जातोय अशी माहिती सेंट्रल जकार्ताचे पोलीस प्रमुख सुसात्यो पुरनोमो कोंड्रो यांनी दिली आहे. मंगळवारी दुपारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथम आग लागली आणि मग ती हळूहळू वरच्या मजल्यांपर्यंत फैलावली आहे. लंचटाइम असताना आग लागल्याने ऑफिसबाहेर गेलेले कर्मचारी बचावले आहेत.

आग लागण्यामागील कारणांचा शोध घेतला जात असून नुकसानीचे आकलन केले जातेय. आग कशामुळे लागली हा अद्याप चौकशीचा विषय असल्याचे जकार्ता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख इस्नावा अदजी यांनी म्हटले आहे.

आग विझविण्यासाठी 28 फायर ट्रक आणि 100 कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तर जखमींना उपचारासाठी पूर्व जकार्ताच्या क्रामत रुग्णालयात हलविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आगीची दुर्घटना घडलेली इमारत ही टेरा ड्रोन इंडोनेशियाचे मुख्यालय आहे. ही कंपनी खाण, कृषी समवेत अनेक क्षेत्रांमध्ये ग्राहकांना हवाई पाहणी ड्रोन सेवा प्रदान करणारी आहे. मदतकार्य पूर्ण होईपर्यंत इमारतीत इतरांना प्रवेश बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.