पत्र्याच्या घराला आग लागल्याने चार लाखांचे नुकसान
नांदेड
तामसा जवळील पांगरी शिवारात शेतात राहणाऱ्या घराला आग लागली. या आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या प्रभावाने म्हैस व दोन रेडकू गंभीर झाले आहेत. येथील शेतकरी मल्लू पुरभा बदरवाड हे कुटुंबियांसह शेतात एका शेडच्या घरात राहतात. रविवारी दुपारी बदरवाड कुटुंबिय शेतातील हळद काढणी मध्ये व्यस्त होते. त्यावेळी घराला अचानक आग लागली.
या आगीत चणा, खताची पोती, गहू, टिव्ही कॉट यांसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. घराशेजारी बांधलेली म्हैस व तिची दोन रेडकू दावे तोडून जखमी अवस्थेत बाजूला करण्यात आली. या दोन्ही जखमी रेडकूंची अवस्था गंभीर आहे.
म्हैशीच्या अंगावरील अनेक भाग होरपळून आणि सोलून निघाला आहे. शेजारील सौरपंपाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे नेमके कारणे समजले नाही. या प्रकरणी तलाठ्यांनी पंचनामा केला आहे.