For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर येथे गवत गंजीला आग लागून नुकसान

10:33 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
पूर येथे गवत गंजीला आग लागून नुकसान
Advertisement

समाजकंटकांनी आग लावल्याचा संशय : पोलिसांत तक्रार

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर या गावातील शेतकरी दुर्गाप्पा देमाण्णा पाटील यांच्या शेतातील चार ट्रॅक्टर गवत गंजीना आग लागून जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने त्यांना धक्का बसलेला आहे. पूर येथील शेतकरी दुर्गाप्पा पाटील यांनी गेल्या आठवड्यात आपल्या शेतातील भाताची मळणी करून तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी तीन ट्रॉली गवत विकत घेतले होते. आपल्या शेतात त्यांनी गवत साठवून ठेवले होते. सोमवारी मध्यरात्री या गवत गंज्यांना आग लावल्याने त्या जळून खाक झाल्या आहेत. मंगळवारी पहाटे रोजच्या प्रमाणे शेताकडे गेल्यावर गवत गंज्या पेटत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी गावकऱ्यांना कल्पना दिली. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हल्याळ येथील अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी तातडीने दाखल होऊन आग विझविली. शेजारील दुर्गाप्पा पाटील यांचा जनावरांचा गोठा होता. गोठ्यात दहा जनावरे होती. पहाटे आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तसेच शेजारील शेतात उसाचे फड आहेत. त्यामुळे जर आग आटोक्यात आली नसती तर ऊस फडालाही आग लागून मोठे नुकसान झाले असते. तालुक्यात गवत गंज्यांना आग लावण्याचे प्रकार घडत असून याबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुर्गाप्पा यांनी खानापूर पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुर्गाप्पा यांची जनावरांच्या चाऱ्यासाठी 8 हजार प्रमाणे तीन ट्रॅाली गवत चार दिवसांपूर्वी विकत घेऊन ठेवले होते. आणि स्वत:ची एक ट्रॉली गवत होते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला असल्याने त्यांना धक्का बसला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.