महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाकुंभमेळा परिसरात अग्नितांडवाने हाहाकार

06:55 AM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

अनेक तंबू बेचिराख : सिलिंडर स्फोटाचा संशय : जीवितहानी टळली

Advertisement

वृत्तसंस्था/ प्रयागराज

Advertisement

उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळा परिसरात रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आगीची दुर्घटना घडल्याने हाहाकार उडाला. महाकुंभमेळा परिसरातील शास्त्राr ब्रिजनजिकच्या सेक्टर-19 मधील छावण्यांमध्ये भीषण आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तसेच एनडीआरएफचे पथकही दाखल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत शंभरहून अधिक तंबू बेचिराख झाले आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला.

स्वयंपाक करताना सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरल्याचे सांगितले जात आहे. तथापि, या दाव्याला अद्याप अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. जोरदार वाऱ्यामुळे काही मिनिटांमध्ये ही आग सेक्टर-19 मधून सेक्टर-20 पर्यंत पसरली. सुरुवातीला अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर जवानांच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला. अग्निशमन दलाच्या पथकासोबत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनीही घटनास्थळी मदतकार्यात मोलाची भूमिका निभावली. आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी योग्य तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याची सूचनाही करण्यात आल्या आहेत.

व्हिडिओ व्हायरल

आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कॅमेराबद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये छावणीमधील अनेक तंबू आगीच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून येत आहे. आखाड्याच्या समोरील रस्त्यावर असलेल्या लोखंडी पुलाखाली ही आग लागली आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडून दखल

आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराजला पोहोचले होते. त्यांनी हेलिकॉप्टरमधून महाकुंभमेळा परिसराची पाहणी केली होती. मात्र, आगीच्या घटनेनंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. आगीच्या घटनेत अद्याप जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia