भारताचे कतारसमवेत महत्त्वाचे करार
धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित, दिल्लीत स्वागत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कतारचे प्रमुख नेते शेख तमीन बिन हमद अल् ठानी हे भारताच्या दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांचे दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अल् ठानी यांची द्विपक्षीय मुद्दे आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्याआधी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशीही चर्चा केली. त्यांचा भारताचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.
त्यांचे सोमवारी भारतात आगमन झाले होते. नेहमीची परंपरा बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था हॉटेल लिला पॅलेसमध्ये करण्यात आली आहे. तेथे सोमवारीच भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मंगळवारी अधिकृतरित्या त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनात भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला.
अनेक करार
ठानी यांच्या या दौऱ्यात भारत आणि कतार यांच्यात अनेक करार करण्यात आले आहेत. इंधन तेल आणि इंधन वायू या पारंपरिक क्षेत्रांच्या पलिकडे जाऊन भारताशी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची कतारची इच्छा आहे. नवे उद्योग आणि गुंतवणूक यात दोन्ही देश सहकार्य करणार आहेत. अल् ठानी यांच्यासमवेत कतारचे व्यापार राज्यमंत्री अहमद बिन मोहम्मद अल् सईद हेही आले आहेत. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कतारच्या दृष्टीने भारत किती महत्त्वाचा देश आहे, हे विशद केले. भारताशी अनेक क्षेत्रांमध्ये भक्कम भागिदारी संबंध प्रस्थापित करण्याची कतारची इच्छा त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रावर लक्ष
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये भारताचे साहाय्य घेण्याची कतारची योजना आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची साऱ्या जगभर चर्चा आहे. कतारही या तंत्रज्ञानात प्रगती करु इच्छित आहे. आज जगात नाट्यामयरित्या परिवर्तन होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान ही अत्यावश्यकता झालेली आहे. अशा स्थितीत भारताच्या या क्षेत्रांमधील कामगिरीचा आणि अनुभवाचा लाभ घेण्याची आमची इच्छा आहे, असे अल् सईद यांनी प्रतिपादन केले.
भारतीय उद्योजकांना आमंत्रण
भारतीय उद्योजकांसाठी कतारमध्ये मोठी संधी आहे. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. आम्ही आमच्याकडील उद्योजक, प्रशासन आणि सरकारी संस्थांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत. परस्पर व्यापार वाढविण्याची आमची इच्छा असून त्यादृष्टीने भारताशी चर्चा केली जात आहे, अशीही माहिती सईद यांनी त्यांच्या मुलाखतीत मंगळवारी दिली.