For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅस गळतीमुळे आगीचा भडका : पाच जखमी

11:09 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅस गळतीमुळे आगीचा भडका   पाच जखमी
Advertisement

बसवाण गल्लीत रेग्युलेटर बदलताना घेतला पेट : दोघांची प्रकृती चिंताजनक, घराबाहेर बघ्यांची गर्दी

Advertisement

बेळगाव : गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बसवाण गल्ली येथे ही घटना घडली असून जखमींपैकी दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ललिता मोहन भट (वय 48), मोहन गोपालकृष्ण भट (वय 56), कमलाक्षी गोपालकृष्ण भट (वय 80), हेमंत भट (वय 27), गोपालकृष्ण भट (वय 84) सर्व राहणार बसवाण गल्ली अशी त्यांची नावे आहेत. जखमींना सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. थोड्या वेळात तेथून केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घराच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली असून घराबाहेर बघ्यांची गर्दी जमली होती. पाचही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार रिकामे सिलिंडर बदलून नव्या सिलिंडरला रेग्युलेटर बसवताना ते नीट बसले नाही. त्यामुळे गॅस गळतीला सुरुवात झाली. जवळच असलेल्या दिव्यामुळे भडका उडाला. त्यावेळी मोहन यांना काय करावे? हे कळले नाही. घरात वृद्ध आई-वडील झोपले होते. त्यांनी लगेच तळमजल्यावर जाऊन इतरांना बोलावून आणले. तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. या घटनेत पाच जण भाजून गंभीर जखमी झाले. तिसऱ्या मजल्यावरील खोलीत हँगरला टांगलेल्या कपड्यांनीही पेट घेतला. आगीत गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. खडेबाजार पोलिसांनी इस्पितळाला भेट देऊन जखमींची जबानी घेतली.

Advertisement

Advertisement
Tags :

.