लॉस एंजिलिसच्या जंगलांमध्ये भडकली आग
लॉस एंजिलिस : अमेरिकेतील लॉस एंजिलिस शहराच्या उत्तर दिशेला पर्वतांमध्ये लागलेली मोठी आग फैलावत असल्याचे पाहून शहरातील 50 हजारांहून अधिक लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला आहे. याचदरम्यान दक्षिण कॅलिफोर्नियात दोन ठिकाणी लागलेली आग अद्याप कायम आहे. जोरदार वाऱ्यांमुळे ही आग विझविणे अवघड ठरले आहे. ह्यूजेस फायर नावाची आग गुरुवारी भडकली, यामुळे काही तासांमध्ये 39 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रातील वृक्षसंपदा जळून खाक झाली आहे. 31 हजारांहून अधिक लोकांना घर रिकामी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर अन्य 23 हजार लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती एलए काउंटी शेरिफ रॉबर्ट लूना यांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड आहे, परंतु अग्निशमन जवान पूर्ण शक्तिनिशी काम करत आहेत. उत्तर-दक्षिणचा मुख्य मार्ग इंटरस्टेट 5चा 48 किलोमीटरचा हिस्सा बंद करण्यात आला आहे.