ढाका शहरात आगीचे थैमान, हजारो बेघर
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशची राजधानी असणाऱ्या ढाका शहरात गुरुवारी झालेल्या भीषण अग्नीतांडवात अनेक घरे भस्मसात झाल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या शहरातील एका झोपडपट्टीत ही आग लागली. हा दाटीवाटीच्या लोकवस्तीचा भाग असल्याने आग लवकर सर्वत्र पसरली आणि ही झोपडपट्टी जळून खाक झाली, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नंतर स्पष्ट केले. आतापर्यंत या अग्नीतांडवात कोणाचीही मृत्यू झालेला नाही. मात्र, काही लोक जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. मात्र, तिचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. या आगीत साधारणत: 1 हजार 500 घरे जळली असावीत असे प्राथमिक अनुमान आहे.
60,000 कुटुंबे
आग लागलेली झोपडपट्टी आशिया खंडातील काही मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक मानली जाते. तिच्यात 60 हजारांहून अधिक कुटुंबे रहात आहेत. झोपडपट्टीची एकंदर लोकसंख्या चार लाखांहून अधिक असावी असे बोलले जात आहे. केवळ 160 एकर भूमीत या 60 हजारांहून अधिक झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपडपट्टीचा एक संपूर्ण भाग जळून खाक झाला आहे. या झोपडपट्टीभोवती अनेक उंच इमारतीही आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.