सचिवालय इमारतीला बांगलादेशात आग
तब्बल सहा तासांनी आगीवर नियंत्रण : फायरमनचा मृत्यू
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशातील सचिवालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना गुरुवारी घडली. राजधानी ढाक्यातील सेगुनबागीचा भागात बुधवारी रात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. सचिवालय इमारत क्रमांक-7 च्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली. काही वेळानंतर आग हळूहळू सातव्या आणि आठव्या मजल्यावरही पसरली. या इमारतीत परिवहनसह 7 मंत्रालयांची कार्यालये असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर सहा तासांनी आग आटोक्यात आणली. या मदत व बचाव कार्यादरम्यान एका अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोहनूर जमान नयन असे मृत अग्निशमन जवानाचे नाव आहे.
मध्यरात्री 1.52 वाजता अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान दहा-पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचले. यानंतर सकाळी 8.05 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. आगीची माहिती मिळताच सुरुवातील अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग एवढी भीषण होती की आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या आणखी 10 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
आगीच्या चौकशीसाठी समिती स्थापन
आगीची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. या समितीत 5 ते 11 सदस्य असतील. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही, असे बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील गृह मंत्रालयाचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी सांगितले.
ढाक्याचे सचिवालय हे बांगलादेश सरकारचे मुख्य प्रशासकीय मुख्यालय आहे. त्यात एकूण 8 इमारती आहेत. यापैकी इमारत क्रमांक-7 मध्ये गुरुवारी मध्यरात्री आग लागली. यात वित्त, परिवहन, कामगार आणि जल मंत्रालय यासारख्या प्रमुख मंत्रालयांची कार्यालये आहेत. यापूर्वी 2019 मध्ये सचिवालयाच्या इमारत क्रमांक 6 मध्ये आग लागली होती.