For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत खासदारांच्या अपार्टमेंट्सला आग

06:39 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत खासदारांच्या अपार्टमेंट्सला आग
Advertisement

सुदैवाने जीवितहानी टळली : अग्निशमन दल उशिराने पोहोचल्याने नाराजी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऐन दिवाळीच्या दिवसात दिल्लीतील डॉ. बिशंबर दास मार्गावर असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट्समध्ये आग लागल्याची घटना शनिवारी घडली. याच अपार्टमेंट्समध्ये राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची घरे असल्याची माहिती समोर येत आहे. संसद भवनापासून ही इमारत केवळ 200 मीटर अंतरावर आहे. आग लागल्याची घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवान तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

Advertisement

आग लागलेल्या अपार्टमेंटमध्ये राज्यसभेचे अनेक खासदार आणि त्यांचे कर्मचारी राहतात. उपस्थित लोकांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती तात्काळ देण्यात आली, परंतु पथक पोहोचण्यास उशीर झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या पाठवण्यात आल्या. आग विझवण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. सुरुवातीला कावेरी अपार्टमेंट्समध्ये आग लागल्याचे वृत्त होते. परंतु योग्य शहानिशा केल्यानंतर जवळच्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट्समध्ये लागल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन विभागाला दुपारी 1:20 वाजता फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या.

जीवितहानी नाही, पण नुकसान मोठे

आग तळमजल्यावरील कचऱ्यापासून सुरू होऊन तिच्या झळा तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरल्या होत्या. तीन मजल्यांवरील अनेक फ्लॅट आगीत जळून खाक झाले आणि संपूर्ण इमारतीच्या बाहेरील भिंती काळ्या पडल्या. घटनेच्या वेळी लोकांनी इमारत रिकामी केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. संसद भवन परिसर हा अतिशय संवेदनशील मानला जातो. याच परिसरात आगीची घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणांची प्रचंड धावपळ उडाली. लाग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. यामध्ये इमारतीतून काही लोकांना बाहेर काढताना पोलीस दिसून येत आहेत. अनेक लोक घाबरलेल्या अवस्थेत इमारतीच्या बाहेर थांबलेले दिसत आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, सीपीडब्ल्यूडी फर्निचरचा साठा बराच काळ तळमजल्यावर पडला होता. त्याला आग लागल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. यासंबंधीची तक्रार यापूर्वीही करण्यात आली होती.  मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तसेच मुलांनी फटाके वाजवल्याने आग लागल्याचा दावाही काहींनी केला. अग्निशमन विभागाला कॉल करूनही त्यांनी यायला विलंब केल्याचा आरोप इमारतीमधील लोकांनी केला आहे. अग्निशमन दलाचे जवान जर वेळेत आले असते तर कमी नुकसान झाले असते, असे इमारतीमधील रहिवासी म्हणाले.

Advertisement
Tags :

.