स्पेअरपार्ट दुकानाला आग; 50 लाखांचे नुकसान
कवठेमहांकाळ :
कवठेमहांकाळ शहरात एम एस या स्पेअर पार्टस या दुकानाला भीषण आग लागून दुकानातील सुमारे 50 लाख ऊपयांचा माल भस्मसात झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजता घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अग्नि शमन दलाच्या गाडीने पुरेपुर प्रयत्न केले, मात्र पाणीही आग आटोक्यात आणण्यास अपुरे पडले, एवढे मोठे रौद्ररूप आगीने धारण केले होते.
कवठेमहांकाळ शहरातील देशिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरग येथील मिथुन शेट्टी यांचे एम. एस. हे स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे. या दुकानाला शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. हा हा म्हणता आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या अिग्नशमन दलाची गाडी बोलवण्यात आली. या गाडीने आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. गाडीतील पाणी संपले मात्र आग आटोक्यात आली नाही, आगीचा डोंब वाढत गेल्याने दुकानातील माल बेचिराख झाला.
आगीने इतके रौद्ररूप धारण केले होते की, धुराचे लोट आकाशाकडे वेगाने जात होते, धुरामुळे शेजाऱ्यांनाही त्रास होत होता. देशिंग कॉर्नरला दुकानाला आग लागल्याची घटना सगळीकडे पसरली आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. बघ्यांची गर्दी एवढी वाढली की पोलिसांना गर्दी हटवणे भाग पडले. पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील, नगराध्यक्ष अजित माने, नगरसेवक राहुल जगताप यांच्यासह अनेक लोकांनी घटनास्थळी भेट दिली. आगीचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.