ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग
अनेक उड्डाणांना विलंब : विमानसेवेवर परिणाम
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात शनिवारी दुपारी आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की विमानतळ प्राधिकरणाला सर्व उड्डाणे तात्काळ थांबवावी लागली. विमानतळाच्या गेट क्रमांक 8 जवळील कार्गो परिसरात दुपारी 2:30 च्या सुमारास आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मालवाहतुकीसाठी दाखल झालेले साहित्य व किंमती वस्तू जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आगीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता. तसेच परिसरातील हवा प्रदूषित झाली आहे.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आली. या पथकांमध्ये बांगलादेश अग्निशमन सेवा, नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, हवाई दलाच्या दोन अग्निशमन दल आणि नौदलाच्या पथकांचा समावेश होता, असे अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्ते तल्हा बिन जाशिम यांनी सांगितले.