Satara : तासवडे औद्योगिक वसाहतीतील टेक्सटाईल कंपनीत आग
टेक्सटाईल कंपनीतील आग विझविण्याचे यशस्वी प्रयत्न
उंब्रज : तासवडे औद्योगिक वसाहतीतील टेक्सटाईल कंपनीत अचानक आग लागण्याची घटना गुरुवारी १३ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतेही हानी झाली नाही. मात्र काही काळ मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कराड अग्निशामक दलाच्या बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझविण्यात आली. कंपनीत स्प्रिंकलर सिस्टमची व्यवस्था असल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत अधिक माहिती अशी, तासवडे औद्योगिक वसाहतीत रुद्र टेक्सटाईल कंपनी आहे. कापसावर प्रोसेस करण्याचे काम या कंपनीत केले जाते. गुरुवारी सकाळी कंपनीच्या एका रूममधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती कराडच्या अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब कंपनीच्या आवारात दाखल झाला. व त्यानंतर संपूर्ण आग विझविण्यात आली. घटनास्थळी तळबीड पोलिसांनी पाहणी केली. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही.
कंपनी मालकाने स्प्रिंकलर सिस्टम बसवून घेतली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आले. तासवडे एमआयडीसीत यापूर्वी आग लागून अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. मात्र या कंपनीत बसवण्यात आलेल्या स्प्रिंकलर सिस्टममुळे मोठी दुर्घटना टळलल्याची चर्चा औद्योगिक वसाहत परिसरात सुरू होती.