डी. के. शिवकुमारांविरुद्ध ‘लोकायुक्त’कडून एफआयआर
बेंगळूर : बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवकुमार यांच्याविरुद्ध लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल करून चौकशी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सीबीआयला चौकशीसाठी दिलेली परवानगी सरकारने मागे घेतली होती. सरकारच्या निर्णयाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, राज्य सरकारने 22 डिसेंबर 2023 रोजी लोकायुक्त विभागाच्या डीजीपींना पत्र पाठवून शिवकुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. शिवकुमारांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवणार : शिवकुमार
बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी आपल्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यावर आपण कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवणार आहे. मी कोणतीही चूक केलेली नाही. आपल्याविरुद्धचे प्रकरण सीबीआयकडे सोपविता येणार नसल्याचे तत्कालिन अॅडव्होकेट जनरलांनी सांगितले होते. यासंबंधीची कागदपत्रे मी माहिती अधिकारांतर्गत मिळविली आहेत. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील तत्कालिन सरकारने प्रकरणी सीबीआयकडे सोपविणे चुकीचे होते. त्यामुळे आपल्या सरकारने सीबीआयला चौकशीसाठी दिलेली परवानगी मागे घेतली होती, असे समर्थन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.