पोलीस स्थानकाला घेराव घालणाऱ्यांवर एफआयआर
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावरही गुन्हा : पोलीस बनले आक्रमक : सरकारी कामात अडथळे आणल्याचा ठपका
बेळगाव : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी रात्री उशिरा शहापूर पोलीस स्थानकाला घेराव घालणाऱ्या शंभरहून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही माहिती दिली आहे. संतिबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळल्याच्या घटनेनंतर सोमवारी सायंकाळी व शुक्रवारी दुपारी राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात निदर्शने करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. ‘ऑपरेटिंग-लव्हर-29’ नावे इन्स्टाग्राम खाते असणाऱ्याने आक्षेपार्ह कॉमेंट केल्याचे लक्षात येताच संतप्त जमावाने शहापूर पोलीस स्थानकाला घेराव घातला होता.
शनिवार दि. 17 मे रोजीच्या रात्री 11.30 पासून मध्यरात्री 1 पर्यंत ते पोलीस स्थानकासमोर घोषणाबाजी सुरू होती. ज्याने आक्षेपार्ह कॉमेंट केली आहे, त्याच्यावर कारवाई करू, असे सांगितल्यानंतरही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आदींसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केला. तरीही पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या सरकारी कामात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत 100 ते 120 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वत:हून फिर्याद दाखल करून घेतली असून 34 नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 189(3), 191(2), 49, 132, 285, सहकलम 190 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीच्या घटनेनंतर पोलीस आक्रमक बनले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता जमाव जमविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला असून वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय निर्माण केल्या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास हाती घेतला आहे.
दोन धर्मियांमध्ये वैर निर्माण केल्याचा ठपका
शहापूर पोलीस स्थानकात आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या ‘ऑपरेटिंग-लव्हर-29’ इन्स्टाग्राम अकौंट असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध धार्मिक भावना भडकावून दोन धर्मियांमध्ये वैर निर्माण केल्याचा ठपका ठेवत कलम 192, भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारच्या घटनासंबंधी दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.