For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

5 वर्षांपूर्वी एफआयआर, आता नोटीस

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
5 वर्षांपूर्वी एफआयआर  आता नोटीस
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी सप प्रमुख अखिलेश यादव यांच्या अडचणीत वाढ

Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या खाणघोटाळ्याच्या तपासाप्रकरणी सीबीआयने माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. या चौकशीत साक्षीदार म्हणून सामील होण्याची सूचना अखिलेश यांना करण्यात आली आहे. तर अखिलेश यांनी दिल्लीला जात चौकशीत सामील होण्यास असमर्थता दर्शविली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सामील होऊ शकतो असे अखिलेश यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी सप अध्यक्षांकडून तपास यंत्रणेला उत्तर पाठविण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी स्वत:च्या उत्तरात सीबीआयच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याप्रकरणी 2019 मध्ये एफआयआर नोंद करण्यात आला होता. परंतु मागील 5 वर्षांमध्ये याप्रकरणी कुठलीच माहिती मागण्यात आली नाही. आता अचानक लोकसभा निवडणुकीपूर्वी सीबीआय नोटीस पाठविण्यात आली आहे. तरीही मी तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे अखिलेश यांनी नमूद केले आहे. सीबीआयने अखिलेश यादव यांना खाण घोटाळ्याप्रकरणी 21 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली होती. तसेच 29 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी दिल्लीत बोलाविले होते. परंतु अखिलेश यांनी गुरुवारी सीबीआयसमोर प्रत्यक्ष स्वरुपात हजर राहणार नसल्याचे सांगितले. मी उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. लखनौमधील माझ्या निवासस्थानी चौकशी केली जाऊ शकते असे अखिलेश यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.

Advertisement

तपासात सहकार्य करण्याची तयारी

पक्षाध्यक्ष तसेच विरोधी पक्षाचा नेता म्हणून उत्तरप्रदेशच्या मतदारांबद्दल माझे घटनात्मक कर्तव्य आहे. परंतु मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. उत्तरप्रदेशातील राज्यसभा निवडणूक आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली होती. प्रत्यक्षात एफआयआर 2019 मधील आहे. 5 वर्षांपर्यंत माझ्याकडून कुठलीच माहिती मागविण्यात आली नाही आणि आता अचानक निवडणुकीपूर्वी नोटीस पाठविण्यात येत असल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे.

आघाडी मजबूत, याचमुळे नोटीस

अखिलेश यांना मिळालेल्या नोटीसप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि मैनपुरीच्या खासदार डिंपल यादव यांनीही टिप्पणी केली आहे. आमची आघाडी मजबूत झाल्यानेच नोटीस मिळाली आहे.  सीबीआय अन् ईडीचा देशात कशाप्रकारे दुरुपयोग होतोय हे आम्ही पाहत आलो आहोत. याचमुळे आगामी निवडणूक ही लोकशाही वाचविण्यासाठीची असणार आहे. आम्ही पूर्ण मजबुतीने निवडणूक लढविणार आहोत, असे डिंपल यादव म्हणाल्या.

अखिलेश यांचा दावा

भाजपची स्थिती सध्या कमकुवत आहे. 10 वर्षे सत्तेत असूनही भाजपचे नेते घाबरलेले आहेत. 2014 मध्ये ते उत्तरप्रदेशात आले होते आणि 2024 मध्ये ते उत्तरप्रदेशातून बाहेर फेकले जातील. देशाचे लोक डोळे मिटून नाहीत, चंदीगडमध्ये भाजपने काय केले हे देशाने पाहिले आहे. हिमाचलमध्ये एका मुख्यमंत्र्याला एफआयआर नोंदवावा लागला आहे. यापूर्वी अशा घटना देशाने कधीच अनुभवल्या नव्हत्या. ईडी अन् सीबीआय हे भाजपचे हस्तक आहेत. आगामी निवडणुकीत आम्ही राज्यातील 80 पैकी 80 जागा जिंकू असा दावा अखिलेश यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.