फिनलंडच्या अध्यक्षांचा ट्रम्प यांना इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फिनलंड या देशाचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भारतासंबंधात महत्वाचा इशारा दिला आहे. अमेरिकेने भारताच्या विरोधात कठोर परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण स्वीकारल्यास भारत शांघाय सहकार्य संघटनेकडे अधिक प्रमाणात झुकेल. त्यामुळे ही संघटना अधिक बळकट होईल. तसे झाल्यास पाश्चिमात्य जग आणि अमेरिका यांना ‘खेळ’ गमवावा लागेल. अमेरिकेने आणि पाश्चिमात्य जगाने भारतासंबंधी कोणतेही धोरण स्वीकारताना ही बाब विचारात घ्यावी, असे आवाहन स्टब यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत भारत, चीन आणि रशिया एकमेकांच्या जवळ येताना दिसले होते. ही परिस्थिती पाश्चिमात्य जगासाठी विशेष आनंददायक नाही. भारत, चीन आणि रशिया हे देश एकत्र आले, तर पाश्चिमात्य जगासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, अशी मांडणी त्यांनी केली आहे.
कमजोर करण्यासाठी...
चीनच्या पुढाकाराने स्थापन झालेली शांघाय सहकार्य संघटना पाश्चिमात्य देशांना दुर्बळ करण्यासाठी आणि त्यांच्या एकात्मतेला तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संघटनेची शक्ती वाढल्यास ती आपले उद्दिष्ट्या साध्य करण्यात यशस्वी होईल. या संघटनेला मर्यादेत ठेवायचे असेल, तर भारताचा वेगळा विचार पाश्चिमात्य देशांना करावा लागेल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. बुधवारी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांची दूरध्वनीवरुन चर्चाही झाली आहे.