अवघ्या दीड दिवसांत खेळ खल्लास!
पर्थची खेळपट्टी इंग्लंडसाठी ठरली कर्दनकाळ : पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
वृत्तसंस्था/ पर्थ
अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्या सत्रापासून सुरू झालेला विकेट्स पडण्याचा सिलसिला थेट दीड दिवसात सामन्याचा शेवट करुन गेला. पर्थच्या धोकादायक खेळपट्टीने इंग्लंडला गुडघ्यावर आणले आणि ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या एकूण 19 विकेट्स पडल्या आणि दुसऱ्या दिवशीही अर्ध्या दिवसाच्या खेळातच 11 विकेट्स पडल्या. इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 164 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 205 धावांचे टार्गेट मिळाले. ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर कांगारुंनी हे लक्ष्य सहज पार करत विजयाला गवसणी घातली. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 4 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाईल.
शुक्रवारी सुरु झालेल्या या सामन्यात मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 172 धावांत गुंडाळला. मात्र त्यानंतर इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्सने कांगारूंवर जोरदार प्रतिहल्ला करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 132 धावांत गुंडाळला. त्याबरोबरच फलंदाजीसाठी अत्यंत कठीण असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडला 40 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. मात्र या आघाडीचा इंग्लिश संघाला फायदा घेता आला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच दुस्रया डावातही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवणार का? याबाबतत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरलेल्या ट्रॅव्हिस हेडने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.
हेडची तुफानी खेळी अन् कांगारुंचा दणक्यात विजय
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 132 धावांत संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. पर्थच्या खेळपट्टीवर ओली पोप (33) आणि अॅटकिन्सन (33) वगळता इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अनुभवी जो रुट दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. कर्णधार बेन स्टोक्स, हॅरी ब्रूकनेही निराशा केली. स्कॉट बोलँड, मिचेल स्टार्क आणि डोगेटच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांत आटोपला आणि कांगारूंना विजयासाठी 205 धावांचे टार्गेट मिळाले. पिचवर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आणि सतत पडणाऱ्या विकेट्स पाहता इंग्लंडचा विजय निश्चित मानला जात होता. पण ट्रॅव्हिस हेडने इंग्लिश गोलंदाजांना अक्षरश: धू-धू धुतले. हेडने एकहाती सामना जिंकून देताना 83 चेंडूत 16 चौकार आणि 4 षटकारासह 123 धावांची तुफानी खेळी साकारली. विशेष म्हणजे, हेडने केवळ 69 चेंडूत शतक ठोकत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून चौथे वेगवान शतक ठोकले. मार्नस लाबुशेनने 51 धावांची अर्धशतकी खेळी करून हेडला उत्तम साथ दिली. ऑसी संघाने 28.2 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्याच विजयी लक्ष्य पूर्ण करत पहिला कसोटी सामना सहज जिंकला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 172 आणि दुसरा डाव 164
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 132 आणि दुसरा डाव 28.2 षटकांत 2 बाद 205 (हेड 83 चेंडूत 16 चौकार आणि 4 षटकारासह 123, लाबुशेन 49 चेंडूत नाबाद 51, वेदरलँड 23, स्मिथ नाबाद 2, कार्से 2 बळी).
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया टॉपवरच!
अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत दणकेबाज विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. कांगारूंनी या चक्रात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. संघाचा विजयाची टक्केवारी 100 आहे. दुसरीकडे, श्रीलंका दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. 54.17 टक्केवारीसह भारत टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर इंग्लिश संघ सहाव्या स्थानावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्टार्कचे 200 बळी
मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानावर फार वेळ टिकू दिलं नाही. पहिल्या डावात 7 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेत स्टार्कने ऑस्ट्रेलियाचा विजयाचा भक्कम पाया रचला. यासह स्टार्कने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 200 बळी घेणारा तो पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन यांच्यानंतर जगातील तिसरा गोलंदाज आहे. अशी कामगिरी करताना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर.अश्विनला मागे टाकले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 219 विकेट्स
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - 215 विकेट्स
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - 201 विकेट्स
रविचंद्रन अश्विन (भारत) - 195 विकेट्स
जसप्रीत बुमराह (भारत) - 184 विकेट्स