लग्नाच्या अंगठीतील हिऱ्याचा शोध
आपल्या जीवनातील काही विशेष प्रसंग अविस्मरणीय ठरावेत, यासाठी अनेक लोक बरेच परिश्रम घेतात, हे आपल्याला माहित आहे. विशेषत: विवाह हा माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग असतो. त्यामुळे अशा प्रसंग परिपूर्णरित्या साजरे करण्यासाठी माणसाची धडपड असते. अशाच एका विवाहासी संबंधित ही घटना आहे. अमेरिकेतील मिशेर फॉक्स नामक महिलेचे तिचाच प्रियकर ट्रेव्हर बालोऊ याच्याशी लग्न ठरले. लग्नात वधू-वरांकडून अंगठ्यांची देवाणघेवाण होते. ही अंगठी अविस्मरणीय ठरावी, अशी मिशेर हिची इच्छा होती. त्यासाठी तिने स्वत:च या अंगठीच्या हिऱ्याचा शोध हिऱ्यांच्या खाणीत जाऊन करण्याचा निर्धार केला. जोपर्यंत असा ‘परिपूर्ण’ हिरा सापडत नाही, तो पर्यंत विवाह प्रलंबित ठेवू, असे तिने आपल्या प्रियकराकडे स्पष्ट केले होते. त्यानेही याला मान्यता दिली. त्यानंतर तिने हिऱ्याचा शोध करण्यास प्रारंभ केला.
तिने प्रथम हिरे कोठे शोधले जाऊ शकतात, याची माहिती इंटरनेटवरुन घेतली. आर्कान्स येथील एका हिऱ्याच्या खाणीत सर्वसामान्य लोक स्वत: हिरा शेधू शकतात, अशी माहिती तिला मिळाली. त्यामुळे तिने तेथे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथे झाडाखालची फुले वेचल्यासारखे हिरे सापडत नाहीत. तर बराच काळ खोदकाम करावे लागते. ते करुनही मनासारखा हिरा सापडेलच याची शाश्वती नसते. हा अनुभव तिला तेथे गेल्यानंतर आलाच. तिने स्वत:समवेत खोदकाम करण्याचे साहित्य नेले होते. मग तिने तेथे खोदकाम अभियान हाती घेतले. अनेक दिवस तिने बरेच शारिरीक परिश्रम करुन खोदकाम चालविले. पण तिला मनासारखा ‘परिपूर्ण’ हिरा सापडला नाही. पण तिने हार मानली नाही. अखेर तब्बल तीन आठवडे स्वत:च्या हाताने खोदकाम केल्यानंतर तिला अकस्मात, तिला हवा होता, तसा हिरा दृष्टीस पडला. प्रारंभी तिला तो एखाद्या दवबिंदूसारखा दिसला. पण निरखून पाहिल्यानंतर तो अत्यंत तेजस्वी असल्याचे तिच्या लक्षात आले. अशा प्रकारे अखेर तिचे अभियान यशस्वी झाले. हा हिरा 3.2 कॅरटचा असून या वर्षी या खाणीत सापडलेला हा तिसरा सर्वात मोठा हिरा आहे.