रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शोधून कारवाई करा
कोल्हापूर :
दत्तजयंती, शहरातील ओढ्यावरील यल्लाम्मा देवीची आंबिल यात्रा, नाताळ, 31 डिसेंबर, कोरेगाव भीमा शौर्यदिन, नूतन वर्षाचे स्वागत यासह सण-उत्सव शांततेत पार पाडणे, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्ह्यांची निर्गती करणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्यावर कारवाया करणे यासह विविध मुद्यावर शुक्रवारी झालेल्या जिल्हा क्राईम बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कोणत्याही परिस्थितीत जिह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत पोलीस दलाने रात्रीचा दिवस करून, निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली. निवडणुका शांततेत सुरळीत पार पाडल्याबद्दल पंडित यांनी शुक्रवारच्या क्राईम आढावा बैठकीत जिह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे कौतुक केले. बैठकीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, डिसेंबर महिन्यात दत्त जयंती उत्सव, शहरातील ओढ्यावरील यल्लाम्पा देवीची अंबिल यात्रा, ख्रिसमस, 31 डिसेंबर, कोरेगाव भीमा शौर्यदिन, नूतन वर्षाचा जल्लोष आणि विविध सण-उत्सव साजरे होणार आहेत. त्या अनुषंगाने जिह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील, याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्हयांची जास्तीत जास्त प्रमाणात निर्गती करावी. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहिम घ्यावी. त्यांच्यावर कायदेशीर कारवाया कराव्यात. सर्वसामान्य व्यक्तींना पोलिस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्या. त्यांच्या तक्रारींची दखल घ्यावी, गंभीर गुह्याबाबत तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, अशा प्रकारच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्राईम आढावा बैठकीत केल्या. यावेळी अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील, जयश्री पाटील, पोलिस उपअधीक्षक अजित टीके, सुजित क्षीरसागर, आप्पासाहेब पोवार, पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेकर, किशोर शिंदे, अजयकुमार सिंदकर, संजीव झाडे, संतोष डोके, नंदकुमार मोरे, सुशांत चव्हाण, दिगंबर गायकवाड, सुनील गायकवाड आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.