अखेर धर्मवीर संभाजी चौकातील काम थांबविले
शंभूप्रेमींनी आवाज उठविताच मनपाला जाग : अधिकाऱ्यांकडून सदर फलक इतर ठिकाणी लावण्याचे आश्वासन
बेळगाव : शंभूप्रेमींच्या विरोधामुळे धर्मवीर संभाजी चौक येथील फलक बसविण्याचे काम अखेर बंद करण्यात आले. ‘तरुण भारत’ने या विरोधात आवाज उठवून शंभूप्रेमींची बाजू मांडली होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वांची बाजू ऐकून घेत सदर फलक इतर ठिकाणी लावण्याचे सांगून खड्डा बुजविला जाईल, असे सांगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
धर्मवीर संभाजी चौक येथील शंभूतीर्थ परिसराचा बुडाकडून विकास करण्यात आला. तीन ते चार वर्षांपूर्वी या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यामुळे या परिसरात स्मारकाच्या सौंदर्यामध्ये बाधा ठरेल, असे कोणतेही फलक लावू नयेत, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु तरीदेखील स्मारकाच्या बाजूला एक फलक उभा करण्यासाठी सोमवारी खोदकाम करण्यात आले.
या विरोधात शंभूप्रेमींनी जोरदार आवाज उठविला. तसेच कामबंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मंगळवारी महानगरपालिकेचे अभियंता आदिल यांच्यासह नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती या ठिकाणी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कामबंद ठेवण्याची मागणी केली. तसेच शंभू स्मारकाचे अजून काम बाकी असून परिसरात संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
खड्डा पुन्हा भरण्याची सूचना
अखेर अधिकाऱ्यांनी कामबंद करत खोदण्यात आलेला खड्डाही पुन्हा भरण्याची सूचना कामगारांना केली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. तसेच महानगरपालिकेच्यावतीने राणी चन्नम्मा चौक, महानगरपालिका कार्यालय, तसेच धर्मवीर संभाजी चौकात फलक उभारण्यात येणार होता. यापैकी धर्मवीर संभाजी चौकातील फलक बसविण्याचे काम बंद करण्यात आल्याने हा फलक आता याच परिसरात इतर ठिकाणी बसविण्यात येणार आहे.