Taraun Bharat Effect : अखेर उंब्रज टोलनाक्यासमोर अनधिकृत रॅम्प हटवला
बराडे गावातील अनधिकृत रॅम्प हटविल्यानंतर स्थानिकांना दिलासा
उंब्रज : बराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत नव्याने सुरू झालेल्या टोलनाक्यासमोर महामार्गलगतचा नाला फोडून तेथे सिमेंट काँक्रिटचा रॅम्प बनवण्यात आला. विनापरवाना हा रॅम्प बनवण्यात आला होता. याबाबत 'तरुण भारत'ने आवाज उठवल्यानंतर एनएचआयकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून अखेर तो रॅम्प काढण्यात आला आहे. एनएचआयच्या या निर्णयाचे स्थानिकांमधून स्वागत होत असून नागरिकांनी 'तरुण भारत'ला धन्यवाद दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, वराडे गावच्या हद्दीत नव्याने सुरू झालेल्या टोलनाक्यासमोर चक्क महामार्गाकडेला बांधलेला नाला फोडल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. सातारचे सुप्रसिद्ध वाडेकर बंधू ज्यांचा 'कंदी पेढेवाले' या नावाने मोठा व्यवसाय सुरू होणार आहे. तिथे या उद्योगाच्या सोयीसाठी महामार्गालगत नव्याने बांधलेला आरसीसी नाला फोडून नुकसान करण्यात आले होते. तसेच सिमेंटचा मोठा रॅम्प अनाधिकृतपणे तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे संपूर्ण काम रात्रीच्या अंधारात करण्यात आल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
बेकायदेशीर बांधकाम केलेला रॅम्प व फोडलेल्या नाल्यावरुन 'तरुण भारत'ने आवाज उठवल्यानंतर एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधितांनी कारवाईला घाबरून फोडलेल्या नाल्याची मलमपट्टी केली. पंरतू परवानगीशिवाय येथे बांधण्यात आलेला भला मोठा रॅम कधी काढला जाणार की नाही याबाबत चर्चा सुरू होते. अखेर आज तो रॅम्प काढण्यात आला आहे.
एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. तसेच एनएचआयचे अधिकारी महेश पाटोळे यांनी रॅम्प काढून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. रॅम्पची कोणालाही परवानगी नाही रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रॅम्प टाकण्याची कोणालाही एनएचआय कडून परवानगी नाही. जिथे असे प्रकार दिसतील तिथे कारवाई केली जाणार आहे, असे महेश पाटोळे यांनी सांगितले.