..अखेर सलगरेत उपद्रवी वानर पिंजराबंद
सलगरे :
सलगरे (ता. मिरज) येथे सलग तीन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या तसेच अनेक ग्रामस्थांवर हल्ले करुन जखमी करणाऱ्या झुंडीतून विभक्त झालेल्या उपद्रवी वानराला अखेर जेरबंद करण्यात यश आले. शासनाच्या वनविभागाचे पथक गावात तीन दिवस तळ ठोकून होते. मात्र वानराने वन अधिकाऱ्यांनाही जेरीस आणले होते. मात्र, गावातीलच काही तरुणांनी अत्यंत धाडसाने व शिताफीने या वानराला पिंजराबंद करण्यात यश मिळविले. सदरचे वानर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याची अभयारण्यात मुक्तता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सलगरेसह परिसरात भक्षाच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात वानरांच्या झुंडी फिरत आहेत. या झुंडीतीलच एक वानर बाजूला पडून गावात भटकले होते. या वानराने नागरिकांवर हल्ले सुरू केले. आत्तापर्यंत चार ते पाच जणांना या वानराने चावा घेऊन जखमी केले होते. त्यामुळे मोकाट वानराबद्दल गावात दहशत निर्माण झाली होती.
वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे एक पथक दोन दिवसांपासून गावात तळ ठोकून होते. ठिकठिकाणी पिंजरा लावून वानराला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या वानराने वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकालाही जेरीस आणले. झाडांवर, इमारतींवर आसरा घेऊन वानर तात्पूरते पसार होत होते व पुन्हा ग्रामस्थांवर हल्ले करण्यासाठी अचानक झाडांवून धावून येत होते.
रविवारी दुपारी गावातील मुख्य चौकात एका फोटो स्टुडिओमध्ये वानर घुसल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाची वाट न पाहता गावातीच सोनू सोलणकर, संतोष कांबळे, विश्वास बामणे, सुमित कांबळे, सचिन लोहार या तरुणांनी अत्यंत शिताफीने स्टुडीओत पिंजरा लावला. यासाठी स्टुडीओचे सिलिंग फोडून आत प्रवेश करत वानराला जेरबंद करण्यात यश मिळविले.
यावेळी वनविभागाचे वनपाल तुषार भोरे, वनरक्षक फलका पठाण, वन मजूर पांडूरंग कांबळे, शिवाजी कांबळे, चालक भोसले तसेच सचिन साळुंखे यांनीही तातडीने धाव घेऊन वानराला ताब्यात घेतले. त्याच्यावर आता उपचार करुन त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणार असल्याचे सांगण्यात आले.