अखेर बाळेकुंद्री खुर्द-पंत बाळेकुंद्री राज्य महामार्गाच्या डागडुजी कामास प्रारंभ
वाहनचालकांतून समाधान : ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
सांबरा : अखेर बाळेकुंद्री खुर्द ते पंत बाळेकुंद्री दरम्यानच्या बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-बागलकोट राज्यमार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून अक्षरश: चाळण झाली होती. मुतगे, बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदि ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनचालकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. याबाबत 28 नोव्हेंबर 2025 रोजी ‘तरुण भारत’ मध्ये ‘बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गाची दुर्दशा’ या मथळ्याखाली सचित्र बातमीही प्रसिद्ध झाली होती. बातमी प्रसिद्ध होताच लगेच कामाला प्रारंभ करण्यात आले आहे. सध्या बाळेकुंद्री खुर्द ते पंत बाळेकुंद्री दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.