अखेर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामकरण
मराठी भाषिकांचा विरोध झुगारून केले बेळगावी
बेळगाव : बेळगाववर आपला हक्क दाखवून देण्यासाठी काही वर्षापूर्वी बेळगावचे नामकरण बेळगावी असे करण्यात आले. त्यानंतरही कॅन्टोन्मेंट बोर्डने बेलगाम असेच नाव ठेवले होते. काही कानडी संघटनांना हे डोळ्यात खुपल्याने त्यांनी विरोध केला. अखेर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे बेळगावी पॅन्टोन्मेंट बोर्ड असे नामकरण करण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत. मराठी भाषिकांचा विरोध असतानाही बेळगावी करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या सर्व विभागात बेळगावी असा उल्लेख करण्यास सुऊवात केली. परंतु कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र बेलगाम कॅन्टोन्मेंट असा उल्लेख करीत होते. हे नाव बदलावे यासाठी काही कन्नड संघटनांनी कॅन्टोन्मेंट बोर्डला निवेदन दिले होते. त्यानंतर कॅन्टोन्मेंटने नामकरणाबाबत हरकती मागविल्या होत्या.
युवा समितीने घेतली होती हरकत
बेळगावच्या नामकरणाला महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीने हरकत नोंदविली होती. तसेच अन्य काही संघटनांनीदेखील विरोध केला होता. त्यानंतरही नामकरण करण्यात आले आहे. 2 रोजी नामकरणाचा आदेश संरक्षण मंत्रालयाने बजावला आहे. तसेच यापुढे बेळगावी कॅन्टोन्मेंट असा उल्लेख करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दैनंदिन व्यवहारात बेळगाव असाच उल्लेख
बेळगाव आपलेच आहे हे दाखविण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगावचे नामकरण करूनही पाहिले. परंतु आजही दैनंदिन व्यवहारात बेळगाव असाच उल्लेख केला जातो आणि कायम बेळगाव अशीच ओळख राहणार.