..अखेर पाच दिवसांच्या तेजीला विराम!
सेन्सेक्सची 609 तर निफ्टीची 150 अंकांवर पडझड
मुंबई
: मागील आठवड्यातील अंतिम शुक्रवारच्या सत्रात बाजार तेजीसोबत सुरु झाला होता. त्यानंतर पुन्हा चालू आठवड्यातील अंतिम दिवशी शुक्रवारच्या सत्रात बाजारात घसरणीचे सत्र राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक यांसह अन्य कंपन्यांच्या समभागात विक्रीमुळे दबाव निर्माण झाला होता. याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक कोसळले.
मुख्य कंपन्यांमधील दबावाच्या स्थितीमुळे बाजारात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 609.28 अंकांनी घसरुन निर्देशांक 73,730.16 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 150.40अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 22,419.95 वर बंद झाला आहे.
या घटनांचा परिणाम
शुक्रवारी बाजाराने सकारात्मक प्रारंभ केल्यानंतर अंतिम क्षणी बाजारात घसरणीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये विश्लेषकांच्या मते जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमती, रुपयाची होणारी घसरण आणि विदेशी निधी काढून घेतला जात असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये वाढलेली काळजी यामुळे बाजारात मोठी पडझड झाल्याचे सांगितले जात आहे.
सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक घसरण राहिली आहे. कंपन्या मार्च तिमाहीत कमाईवर गुंतवणूकदारांना खुश करण्यात अपयशी ठरल्या आहेत. यात बजाज फायनान्सचे समभाग हे जवळपास 8 टक्क्यांनी खाली आपटले आहेत. यासोबतच बजाज फिनसर्व्ह 3 टक्क्यांपेक्षा अधिकने प्रभावीत राहिले, तर इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभागही नुकसानीत राहिले आहेत.अन्य कंपन्यांमध्ये आयटी सेवा देणाऱ्या कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांच्याकडून महसूल वाढविण्यासाठी तीन वर्षाचा रोडमॅप तयार केला आहे. टेक महिंद्राचे समभाग 7 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. यासह विप्रो, आयटीसी, टायटन आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले.