महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर शतकी हत्ती उठला!

06:34 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अखेर अखिल भारतीय मराठी नाट्या परिषद आयोजित शतक महोत्सवी मराठी नाट्या संमेलनाचा प्रारंभ पहिले नाटककार शाहराज उर्फ शाहजिय राजे भोसले यांच्या तामिळनाडूच्या तंजावर येथील सरस्वती महालात असलेल्या  नाट्यासंहितांना वंदन करून आजपासून होत आहे. दोन दिवसांनी आधुनिक नाट्याकलेचे जनक विष्णुदास भावे यांची भूमी असलेल्या सांगली मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. तर प्रत्यक्षात शंभरावे नाट्या संमेलन सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड या लक्ष्मीपुरीत होत आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी आकुर्डी येथे पार पडले. वास्तविक चार वर्षांपूर्वी सांगलीत हे संमेलन होणार म्हणून एक वेगळेच बोधचिन्ह करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान कोरोनाचा काळ सुरू झाला आणि चार वर्षे नाट्यासंमेलन रखडले ते रखडलेच. आता नवे संमेलन नव्या स्थितीचा बोध करून देत आहे. एक मस्त हत्ती सोंडेने पाणी फवारत आहे आणि ते जल चहूदिशांना कमळाची पाकळी फुलावी तसे फुलत पसरले आहे. मध्यभागी शंभराचा आकडा आणि आजूबाजूला मंगल रंग दिसत आहेत... बोधचिन्ह हाच बोध देत आहे की, शतकी नाट्या संमेलनाचा चिखलात रुतून बसलेला हत्ती एकदाचा उठला आहे! त्याने आपली सोंड उंचावली आहे आणि अर्थनगरी पिंपरी चिंचवडमध्ये ऐश्वर्याचे शिंपण करणारी आपली प्रतिमा दर्शवून नाटकाचा दुसरा अंक सुरू झाल्याची चाहूल दिली आहे. पण, म्हणून पहिल्या अंकातील सगळे प्रसंग लगेच विस्मृतीत जाणार नाहीत. पण, तत्पूर्वी पिंपरीत येण्यापूर्वी काय काय कार्य बाकी आहे तेही लक्षात घेतले पाहिजे. आज तंजावरमध्ये 99 व्या संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते शाहराज उर्फ शाहजियराजे भोसले यांनी सन 1690 मध्ये लिहिलेल्या लक्ष्मीनारायण कल्याण या पहिल्या मराठी नाटकासहित इतर संहितांना वंदन करण्या बरोबरच नांदी, गणेश वंदना, नटराज नृत्य आणि शाहराज उर्फ शाहजियराजे भोसले यांनी  लिहिलेल्या लक्ष्मीनारायण कल्याण नाटकातून प्रवेश सादर करून प्रारंभ होणार आहे. हा प्रवेश 99 व्या नाट्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करणार आहेत. म्हणजे अर्थनगरी-

Advertisement

लक्ष्मीपुरीपूर्वी सरस्वतीच्या महालात शब्दधनाचे पूजन होणार आहे. ज्याची मराठी सारस्वताला आणि नाट्याजगतासही नितांत आवश्यकता आहे. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी सांगलीत मुहूर्तमेढ रोवली जाईल. कारण शहराज राजे भोसले यांच्यानंतर सुमारे दीडशे वर्षांनी 1843 मध्ये भावे यांनी सांगलीत लिहिलेल्या आणि सादर केलेल्या सीता स्वयंवर या नाटकाला आद्य नाटक म्हटले जात होते. त्यानंतर पुढे आलेल्या संशोधनातून तंजावरची नाट्या परंपरा पुढे आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शूर, राजकारण धुरंधर तसेच रसिक कलाभिज्ञ, बहुभाषाविद कवी, नाटककार शाहराज राजे भोसले हे मराठी, हिंदी आणि तामिळ रंगभूमीचे आद्य नाटककार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 99 व्या संमेलनाध्यक्षांच्या विनंतीला मान दिला गेला. हळदीची नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाट्या पंढरी सांगली मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरले! नाटकाच्या एकेक बाजू सावरल्या जात असाव्यात असे वाटण्यासारखेच हे वातावरण!  नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड येथे शतक महोत्सवी नाट्यासंमेलन झाल्यानंतर नगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर, मुंबई येथे विभागीय नाट्या संमेलने होणार आहेत. रत्नागिरीचा सुद्धा यामध्ये समावेश होईल. या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा की खेद असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनानंतर नाट्यासंमेलन थांबले. तसेच साहित्य संमेलन ही थांबले होते. मात्र टाळेबंदी हटताच आतापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडली. पण, शंभरावे असून नाट्यासंमेलनाला काही मुहूर्त लागला नाही. महाराष्ट्र शासनाने मनावर घेतले असते तर सांगलीतले शंभरावे संमेलन होऊन त्यानंतर राज्यभर किंवा देशभर अनेक विभागीय संमेलने आतापर्यंत पार पडली असती. मात्र नाट्या परिषद आणि शासन यांच्यामध्ये फक्त चर्चेच्या फैरी झडत राहिल्या. नाट्या परिषदेकडे स्वत:चा इतका मोठा व्याप, खर्च सांभाळता येईल असा निधी नाही. राज्य सरकारने ही जबाबदारी अक्षरश: टाळली. पिंपरी चिंचवडच्या गळ्यात ही माळ घालून संमेलनाची शंभरी पार करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा की मखमली पडद्यामागचे दारिद्र्या? मावळते अध्यक्ष  गज्वी यांनी भारतभर मराठीचा डंका पिटण्याची आणि मराठी रंगभूमीला भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करण्याची चालून आलेली उत्तम संधी आपण गमावली असल्याची खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात ज्या शहरांमध्ये विभागीय संमेलने होतील त्या बरोबरच दिल्ली, पानिपत, भोपाळ, इंदूर, बडोदे, प्रयागराज, कोलकाता, हैदराबाद, तंजावर, बेंगळुरू, पणजी अशा जिथे मराठी माणसांचे अस्तित्व आहे अशा महत्त्वाच्या ठिकाणी शंभरावे संमेलन गाजवता आले असते, मात्र, मराठी माणसाला आपल्याच अंगणात खेळायची बाल सवय असल्यामुळे असेल कदाचित. पण, भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करण्याची संधी गमावली अशी टीका गज्वी यांना करावी लागली आहे. चार वर्षे अध्यक्ष म्हणून ते टिकून राहिले हा त्यांचा विक्रमच. यंदाच्या भावे गौरव पदक प्रदान समारंभाला ते त्यामुळेच सांगलीला गेले नसावेत. मावळतीला त्यांनी मराठी नाटक कौटुंबिक चौकटीतच अडकून पडले, मनोरंजन हाच त्याचा स्थायीभाव, प्रेक्षकानुनय हीच मर्यादा आणि तुरळक अपवाद वगळता मराठी नाटकांचे अनुवाद का होत नाहीत? असे प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे, दिशा पुढच्या संमेलनात मिळावी. नाटकाचा हत्ती चिखलातून उठला आहेच तर आता त्यावर संयोजक म्हणून बसणाऱ्यांना कटोरा फिरवायची वेळ यापुढे येऊ देऊ नये. त्यांना त्यांच्या नाट्याकलेवर लक्ष केंद्रित करू द्यावे आणि ती कला तंजावरच्या काळाप्रमाणे बहरात आणावी. सांगलीत मिळाला तसा तिला राजाश्रय मिळावा इतकीच आजच्या दिनाच्या निमित्ताने माफक अपेक्षा.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article