For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर बिगूल वाजले

06:36 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अखेर बिगूल वाजले
Advertisement

महाराष्ट्रातील 2460 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी घोषणा केली आणि प्रतिक्षेत असलेले इच्छुक सरसावले. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सुरेश कांकाणी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आणि 2 डिसेंबरला मतदान व 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष कारभार हाती घेतील हे स्पष्ट झाले. 10 तारखेपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात 18 तारखेला छाननी 26 नोव्हेंबरला चिन्ह वाटप असा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत त्यामुळे या निवडणुकांकडे अनेकांचे बारकाईने लक्ष आहे. या निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रात मतचोरी, दुबार मतनोंदणी वगैरे विषय ताणले गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आणि पाठोपाठ झालेल्या निवडणुकीत मविआ तोंडावर पडली. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, संजय राऊत यांनी मतचोरी, दुबार मतदार नोंदणी हा मुद्दा लावून धरला आणि आधि मतदार याद्या शुद्ध करा व मग निवडणुका घ्या अशी मागणी लावून धरली आहे. ठाकरे बंधू मुंबई महापालिकेसाठी विशेष आग्रही असले तरी मतचोरी, हा विषय सध्या तापला आहे. माविआला व ठाकरेंना पराभव दिसतो आहे. त्यामुळे त्यांनी रडीचा डाव सुरु केला आहे, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. लोकसभा जिंकली की मतदान यंत्र चांगले, मतदार यादी बरोबर आणि निवडणूक हरली किंवा हरणार असे दिसले की निवडणूक आयोग भाजपा घार्जिणा, मतदार खोटे अशा आरोळ्या सुरू होतात. तसे पाहिले तर मतदार यादी शंभर टक्के अचूक अशी काल नव्हती आणि उद्याही नसणार. मतदार यादीत दोन वेळा नाव असेल तर बोटाची शाई पूसा आणि दोन वेळा शिक्का मारा असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काही वर्षांपूर्वीचे विधान कुणी विसरलेले नाही. माणसे घर बदलतात, गाव बदलतात, काहींचे नाव गावाकडच्या यादीत असते आणि मुंबईत ही असते.आता संगणकामुळे या गोष्टी लक्षात येवू लागल्या आहेत. पण ही ओरड कित्येक वर्षांची आहे. लोकसभा निवडणुकीत घटना संकटात असा प्रचार माविआने सेट केला होता. याच जोडीला आरक्षणाचे मुद्दे तापवले होते. त्यामुळे माविआ महाराष्ट्रात बरे यश मिळवू शकली. पण भाजपा महायुतीने त्यातून योग्य धडा घेतला. लाडकी बहीण योजना असो वा मराठा आरक्षण त्यामध्ये तडाखेबाज भूमिका घेतली. यांचा परिणाम विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड यश मिळवू शकली.

Advertisement

या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पाडणार व न्यायालय आदेशाचे पालन करणार असे स्पष्ट केले आहे. ते स्वाभाविक आणि बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर व्हीव्हीपॅट वापरणार नाही. तसेच दुबार नोंदणी आयोगाच्या टूलने हुडकून त्या नावासमोर ङङ असे चिन्हांकन करणार. त्यांची पूर्ण ओळख पटल्यावरच त्या मतदाराला मतदानाची मुभा देणार. त्यांचेकडून हमीपत्र लिहून घेणार वगैरे तपशील जाहीर केले आहेत. या निवडणुकांसाठी 1 जूलैचीच मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. एकूणात मतदार, मतदार याद्या, दुबार मतदार नोंदणी आणि मतदान टक्का वाढीव रहावा यासाठीची कसरत या निवडणुकीत करावी लागणार आहे. दिल्लीत, मुंबईत सत्ता दिलीत. आता गावाची सत्ता द्या आणि विकासासाठी तिहेरी इंजिन विजयी करा असे आवाहन भाजप नेते अमित शहा यांनी केले आहे. मतदार काय करणार हे तिकीट वाटपापासून प्रचारापर्यंत अनेक गोष्टीवर अवलंबून असते. पण या निवडणुकीला गावकी, भावकी, माणूसकी असे अनेक संदर्भ व लक्ष्मीदर्शन असे संदर्भ असतात. यामध्ये सर्व पक्ष, इच्छुक तरबेज असतात, कुणाला झाकावे कुणाला काढावे असा भेद करणे कठीण आहे. सारे एकाच माळेचे मणी आहेत. या वेळच्या निवडणुकांचे वैशिष्ट्या म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष सारे गावकरी नगराध्यक्ष निवडीसाठी मतदान करणार व त्यातून राज्यात 288 नगराध्यक्ष निवडून येणार.ओघाने ही निवडणूक महाराष्ट्राचा कौल दाखवणारी म्हटले तर वावगे ठरू नये. या निवडणुकीची आचारसंहिता गावा पुरतीच लागू होणार आहे. त्यामुळे सारे राज्य व विकासकामे ठप्प होण्याचे कारण उरलेले नाही.लोकनियुक्त नगराध्यक्ष हा उद्याचा विधानसभा उमेदवार होवू शकतो. त्यामुळे या चाचणी परीक्षेत तावून सुलाखून बाहेर यावे लागते. निवडणुका झाल्या आणि लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक कार्यरत झाले की पालिका, महापालिका हद्दीत आणि ग्रामीण भागात चांगला कारभार होईल अशी अपेक्षा असते. पण पुर्वानुभव पहाता सायकलने फिरणारे लोकसेवक मालामाल होतात आणि शहराचे, गावाचे प्रश्न आक्राळ विक्राळ होतात. दिवा-बत्ती, स्वच्छता, आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, महिला विकास,शिक्षण असे सहा सात विषय आणि महानगरांसाठी शहरी वाहतूक असे काम असते

पण कोणत्याही शहरात गावात यातील कोणतेही काम आदर्श होत नाही. प्रदूषित पाणी, हवा, आणि अस्वस्थता हे विषय आणि रस्ते व वाहतूक या समस्या सर्वत्र गंभीर बनल्या आहेत. सरकारी आणि मराठी शाळा बंद पडत आहेत. खासगी शिक्षण संस्था व नेते भूखंडावर टपून आहेत. लोकांना स्वच्छ पाण्यासाठी खासगी सेवा खरेदी कराव्या लागत आहेत.नदी नाले गटारगंगा झाले आहेत. घरोघरी गुडनाईट जाळले जाते आहे. आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत आहेत. रस्ते तेच आणि वाहने दुप्पट चौपट झाली आहेत. रोजगार आणि शेती अडचणीत आहे. अशा वेळी कोणत्याही प्रलोभनाला वा जात-धर्म यात न अडकता गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ हाताच्या, सेवाभावी वृत्तीच्या, व्हिजन असलेल्या

Advertisement

उमेदवारांना विजयी केले पाहिजे. अन्यथा बिगूल वाजले, पण कालचा दिवस बरा होता असे म्हणायची वेळ येवू शकते. या निवडणुकीत कर्तव्य भावनेने, जागृतपणे मतदान केले पाहिजे आणि लोकशाही बळकट करतानाच गावचा, शहराचा, चौफेर विकास होईल यासाठी मतदान केले पाहिजे. तेच ते थोडे बाजूला ठेवून नवे चांगले युवक स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवले पाहिजेत.

Advertisement
Tags :

.