अखेर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले
जनतेतून समाधान
प्रतिनिधी/ बेळगाव
अमननगर, उज्ज्वलनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांवर हल्ला केला. त्यानंतर या कुत्र्याला पकडण्याची मोहीम महानगरपालिकेने राबविली. शुक्रवारी रात्री त्या कुत्र्याला पकडण्यात आले. यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अमननगर, उज्ज्वलनगर परिसरामध्ये, तसेच गांधीनगर येथेही या पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांवर हल्ला करत 14 जणांचा चावा घेतला. त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी थेट महानगरपालिकेकडे धाव घेतली होती. कुत्र्याला पकडावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी त्या परिसरात पथक पाठविले. राजू संकन्नावर हे सकाळपासूनच त्या परिसरात ठाण मांडून होते.
शुक्रवारी दुपारपासूनच त्या कुत्र्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी धडपडत होते. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक तरुणांनीही यासाठी प्रयत्न केले. शेवटी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या कुत्र्याला पकडले. त्यानंतर त्याला श्रीनगर येथील नसबंदी केंद्रामध्ये दाखल केले आहे. यापूर्वीही या परिसरात कुत्र्याने अनेकांवर हल्ला केला होता. या परिसरात कुत्र्यांचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.