For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनमोहनसिंग यांना अंतिम मानवंदना

06:58 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनमोहनसिंग यांना अंतिम मानवंदना
Advertisement

निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिवंगत नेते मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहनसिंग यांच्या कन्या उपिंगदरसिंग यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी मनमोहनसिंग यांच्या अन्य दोन कन्याही उपस्थित होत्या. दिल्लीच्या निगमबोध घाटावर अग्निसंस्कार करण्यात आला. 21 तोफांची मानवंदना डॉ. मनमोहनसिंग यांना देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, सेनादलांचे इतर मुख्य अधिकारी, मनमोहनसिंग यांचे नातेवाईक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे इतर अनेक मान्यवर नेते आणि मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. साश्रू नयनांनी आणि दु:खभऱ्या अंत:करणांनी सर्व उपस्थितांनी भारताच्या या प्रिय नेत्याला अंतिम निरोप दिला आहे.

Advertisement

 

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयापासून डॉ. मनमोहनसिंग यांच्या पार्थिवाच्या अंत्ययात्रेचा प्रारंभ झाला. सहस्रावधी नागरिकांनी अंत्ययात्रा मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभे राहून त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. याप्रसंगी अनेकांना आपल्या भावनांना आवर घालणे कठीण झाले होते. काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि सिंग यांचे अनेक परिचित या अंत्ययात्रेत सहभागी झाले होती, मनमोहनसिंग अमर रहे, आणि ‘जबतक सूरज चांद रहेगा, मनमोहनसिंग तेरा नाम रहेगा,’ अशा घोषणा देऊन लोकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुरुवारी झाले होते निधन

डॉ. मनमोहनसिंग यांचे निधन गुरुवारी रात्री झाले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथेच त्यांची वयाच्या 92 व्या वर्षी, प्राणज्योत मालविली. हा साऱ्या देशालाच मोठा धक्का होता. मनमोहनसिंग यांनी 1991 ते 1996 या कालखंडात भारताच्या अर्थमंत्रिपदाचे उत्तरदायित्व समर्थपणे सांभाळले होते. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांना देशाच्या सर्वोच्च पदाची संधी प्राप्त झाली होती. भारताच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचे शिल्पकार अशी सिंग यांची ख्याती आहे.

पार्थिव काँग्रेस मुख्यालयात

मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानात त्यांचे पार्थिव शुक्रवारी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. तेथे सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, प्रियांका गांधी आदी काँग्रेस नेत्यांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. अनेक सर्वसामान्य नागरिकांनीही मनमोहनसिंग यांच्या अंतिम दर्शनासाठी रीघ लावली होती.

राहुल गांधी सातत्याने समवेत

मनमोहनसिंग यांच्या अंत्ययात्रेत राहुल गांधी सहभागी झाले होते. काँग्रेसचे अनेक नेतेही शुक्रवारपासून मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी आणि काँग्रेस मुख्यालयात होते. पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी निगमबोध घाटावर आणण्यात आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले.

सेनादल अधिकाऱ्यांची मानवंदना

संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि भूदल, वायूदल तसेच नौदल यांच्या प्रमुखांनी मनमोहनसिंग यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली. तिन्ही सेनादलांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला असून या काळात महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम केले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रध्वजही अर्ध्यावर फडकविला जात आहे. काँग्रेसशासित राज्यांनीही मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे दुखवटा घोषित केला. बेळगाव येथील काँग्रेसचे अधिवेशनही गुरुवारीच संपविण्यात आले होते.

अंत्यसंस्कारावरुन प्रचंड वादंग

मनमोहनसिंग यांच्यावर अंत्यसंस्कार कोठे करण्यात यावेत यावरुन शुक्रवारी मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. अंत्यसंस्कार अशा स्थानी करण्यात यावेत, की जेथे नंतर मनमोहनसिंग यांचे स्मारक स्थापन करण्यात येईल, असे काँग्रेसचे म्हणणे होते. तथापि, केंद्र सरकारने अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करण्याचा निर्णय घेतला. निगमबोध घाट ही सार्वजनिक अंत्यसंस्कार भूमी आहे. केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सिंग यांचा अवमान करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली होती. तर पी. व्ही. नरसिंहराव यांचे स्मारक काँग्रेसने स्थापित केले नव्हते, अशी आठवण प्रत्युत्तरासाठी भारतीय जनता पक्षानेही करुन दिली होती. या वादामुळे काहीकाळ राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मध्यरात्री स्मारकाचा निर्णय

मनमोहनसिंग यांचे सुयोग्य स्मारक स्थापन करण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवार आणि शनिवार यांच्या मधल्या रात्री घोषित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मल्लिकार्जुन खर्गे यांनी संपर्क प्रस्थापित केला होता. सिंग यांच्या स्मारकासाठी स्वतंत्र स्थान निर्धारित करण्यात येईल, अशी घोषणाही केंद्र सरकारने यावेळी केली. काँग्रेसने कधीही मनमोहनसिंग यांना योग्य तो सन्मान दिला नाही. आता त्यांच्या निधनानंतरही काँग्रेस वाद निर्माण करीत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शुक्रवारी केली होती.

बायडेन यांची श्रद्धांजली

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल यांनी मनमोहनसिंग यांना शनिवारी श्रद्धांजली अर्पण केली. मनमोहनसिंग हे माझे निकटचे स्नेही होते. त्यांच्या निधनामुळे भारतीयांना झालेल्या दु:खात माझी पत्नी आणि मी सहभागी आहोत. सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर आणि त्यांचे अन्य आप्तेष्ट यांच्या दु:खातही आम्ही सहभागी आहोत. भारत आणि अमेरिका यांच्यात आज जे अनन्यसाधारण सहकार्य प्रस्थापित झाले आहे, त्यात मनमोहनसिंग यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते. अणुसहकार्य ते क्वाड अशा विविध माध्यमांमधून हे सहकार्य होत आहे. सिंग यांनी या सहकार्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे, असे बायडेन यांनी संदेशात स्पष्ट केले आहे.

शर्मिष्ठा मुखर्जी यांची टीका

मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारांच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादात दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांनीही उडी घेतली आहे. निगमबोध घाटासंबंधी काँग्रेसने व्यक्त केलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आपल्या नेत्यांचाही सन्मान ठेवीत नाही. माझे पिता प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही आयोजित केली नव्हती. राष्ट्रपतींच्या निधनानंतर अशी बैठक बोलाविण्याची प्रथा नाही, असे काही काँग्रेस नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. हे धांदांत खोटे आहे. कारण आर. के नारायणन या माजी राष्ट्रपतींचे निधन झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक श्रद्धांजली देण्यासाठी झाली होती. त्यामुळे केँग्रेसचे म्हणणे खोटे ठरले, अशी भूमिका शर्मिष्ठा यांनी स्पष्ट केली.

विदेशी नेत्यांचीही उपस्थिती

मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी विदेशी नेतेही उपस्थित होते. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक, तसेच मॉरिशसचे विदेश व्यवहार मंत्री धनंजय रामफल हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या देशाच्या वतीने सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. वांगचुक यांनी याप्रसंगी सिंग यांच्याशी त्यांच्या असलेल्या स्नेहाच्या आठवणींनाही उजाळा दिला. अनेक विदेशी नेत्यांनी श्रद्धांजली संदेश पाठविले.

देश शोकसागरात...

ड मनमोहनसिंग यांना अंतिम निरोप देण्यासाठी निगमबोध घाटावर जनसागर

ड सिंग यांचे कार्य सर्वकाळ स्मरणार राहील : सर्व पक्षांच्या नेत्यांची प्रतिक्रिया

ड सिंग यांचे यथोचित स्मारक स्थापन केले जाणार : केंद्र सरकारकडून घोषणा

ड अनेक विदेशी नेते, मान्यवरांचीही मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Advertisement
Tags :

.