प्राप्तिकर विभागाचे हिमाचल प्रदेशमध्ये छापे
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशमधील सोलन जिह्यातील बद्दी औद्योगिक क्षेत्रातील झाडमाजरी येथे असलेल्या एका खासगी कंपनीवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. सकाळी 6.30 वाजता प्राप्तिकर विभागाचे पथक झाडमाजरी येथील कॅप्टाब बायोटेक युनिट-2 मध्ये पोहोचले. या कारवाईमुळे बद्दीच्या उद्योगपतींमध्ये घबराट निर्माण झाली. सायंकाळी उशिरापर्यंत कंपनीमध्ये प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू होती.
कॅप्टाब बायोटेक ही कंपनी बद्दी येथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करातील कथित अनियमिततेच्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला आहे. प्राप्तिक विभागाचे पथक कंपनीच्या आर्थिक कागदपत्रांची तसेच औषधांच्या नोंदींची बारकाईने तपासणी करत आहे. पथक प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास करत आहे. या तपासणीदरम्यान कंपनीमध्ये कोणालाही प्रवेश किंवा बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.