For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा अंतिम टप्प्यात

06:51 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा अंतिम टप्प्यात
Advertisement

गुकेशचा सामना आता कारुआनाशी, प्रज्ञानंदसाठी पुढील दोन सामने महत्त्वपूर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ टोरँटो

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचा आता अंतिम टप्पा सुरू होत असून भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशचा सामना 11 व्या फेरीत अव्वल मानांकित फॅबियानो काऊआनाशी होणार आहे. यावेळी गुकेशसमोरील आव्हान अधिक खडतर असेल. कारण स्पर्धा संपण्याच्या जवळ पोहोचत असल्याने त्याला आपले स्थान अधिक मजबूत करणे भाग आहे.

Advertisement

17 वर्षीय गुकेश रशियाच्या इयान नेपोम्नियाचीसोबत संयुक्तपणे आघाडीवर आहे. इतर भारतीयांमध्ये 18 वर्षीय आर. प्रज्ञानंद विश्रांतीच्या दिवसानंतर ताजातवाना होऊन अमेरिकच्या हिकारू नाकामुराविऊद्ध लढेल. फक्त चार फेऱ्या बाकी असताना या दोन्ही युवा भारतीय खेळाडूंसाठी समान प्रमाणात संधी आहे. विदित गुजराथीनेही स्वत:ला शर्यतीत ठेवलेले असले, तरी त्याला समाप्ती अधिक चांगल्या प्रकारे करावी लागेल.

नेपोम्नियाची हा आतापर्यंतचा एकमेव अपराजित खेळाडू, असून तो ‘फिडे’च्या ध्वजाखाली खेळत आहे आणि पुढील दोन फेऱ्यांमध्ये त्याला खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. गुजराथीची गाठ पुढच्या फेरीत नेपोम्नियाचीशी पडेल आणि त्यानंतर त्याचा प्रज्ञानंदशी सामना होईल. हे दोन सामने स्पर्धेची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने आणि विश्वविजेत्याचा नवा आव्हानवीर ठरविण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात.

गुकेशसाठी काऊआनासोबतची लढत महत्त्वपूर्ण आहे. कारण तो पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणार आहे. मूळचा इटालियन नागरिक असलेल्या आणि आता अमेरिकी नागरिक बनलेल्या कारुआनाची ही सलग सहावी कँडिडेट्स स्पर्धा आहे. परंतु तो फक्त एकदाच ही स्पर्धा जिंकू शकला आहे. कारुआनाचा अडथळा सुखरुपपणे पार केल्यास गुकेश 12 व्या फेरीत सर्वांत खालच्या स्थानावर असलेल्या आबासोव्हला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

भारतीय दृष्टिकोनातून पुढील दोन फेऱ्यांमधील सर्वांत महत्त्वाचे सामने प्रज्ञानंदचे आहेत. त्याने गेल्या विश्वचषकात नाकामुराला पराभूत केले होते आणि आता त्याची पुनरावृती घडविण्याची इच्छा तो बाळगून असेल. नाकामुराला गुजराथीने दोन्ही सामन्यांत पराभूत केलेले आहे. त्यानंतर प्रज्ञानंद नेपोम्नियाचीविऊद्ध लढेल. जर तो या दोन सामन्यांचा दबाव यशस्वीरीत्या पेलू शकला, तर त्याच्याकडून जेतेपदाची अपेक्षा केली जाऊ शकते. महिला विभागात झोंगयी टॅन आणि टिंगजी लेई या दोन चिनी खेळाडूंमध्ये शर्यत आहे. कोनेरू हम्पीला अजूनही संधी मिळू शकत असली, तरी व्यावहारिकदृष्ट्या विचार करता या विभागात भारतीय आव्हान जवळजवळ संपले आहे.

Advertisement
Tags :

.