ठळकवाडी-भातकांडे यांच्यात आज अंतिम लढत
हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 17 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ठळकवाडी संघाने लव्हडेल सेंट्रल संघाचा 43 धावांनी तर गजाननराव भातकांडे संघाने वनिता विद्यालय संघाचा 8 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रज्योत उघाडे, मीर एम. यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या उपांत्य सामन्यात ठळकवाडीने प्रथम फलंदाजी करताना 19.1 षटकात सर्व गडी बाद 119 धावा केल्या. प्रज्योत उघाडेने 1 षटकार 4 चौकारांसह 42, लव्हडेलतर्फे अथर्व चव्हाणने 12 धावात 3, वेदांतने 24 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर लेव्हडेल सेंट्रल संघाने 20 षटकात 8 गडी बाद 77 धावा केल्या. अंशने 1 षटकार 1 चौकारांसह 19, अजय लमाणीने 2 चौकारांसह 15, अमित एम.एस.ने 2 चौकारासह 12, वेदांत बजंत्रीने 11 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे मयूर जाधवने 13 धावांत 2, साईनाथने 14 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात वनिता विद्यालय संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्व गडी बाद 67 धावा केल्या. मयांकने 2 चौकारांसह 15 तर समर्थने 10 धावा केल्या. भातकांडेतर्फे मीर एम. ने 11 धावात 4, साईश रायकरने 10 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भातकांडे संघाने 9.3 षटकात 2 गडी बाद 69 धावा जमवित सामना 8 गड्यांनी जिंकला. वीरने 5 चौकारांसह 27, सलमान धारवाडकरने 2 चौकारांसह 15 धावा केल्या.