For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वायटेक-अॅनिसिमोव्हा यांच्यात अंतिम लढत

06:55 AM Jul 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वायटेक अॅनिसिमोव्हा यांच्यात अंतिम लढत
Advertisement

साबालेंका, बेन्सिक पराभूत, सिनियाकोव्हा वर्बीक मिश्र दुहेरीत विजेते

Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पोलंडची इगा स्वायटेक आणि अमेरिकेची अमंदा अॅनिसिमोव्हा यांनी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी स्वायटेक आणि अॅनिसिमोव्हा यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. बेलारुसची आर्यना साबालेंका आणि स्वीसची बेलिंडा बेन्सिक यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. झेकची सिनियाकोव्हा आणि हॉलंडचा वर्बीक यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.

Advertisement

महिला एकेरीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या 13 व्या मानांकीत अमंदा अॅनिसिमोव्हाने बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाचा 6-4, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अॅनिसिमोव्हाच्या या विजयामुळे 2025 च्या टेनिस हंगामात आता अमेरिकेच्या महिला टेनिसपटूंनी तिसरे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्याचे आव्हान जीवंत ठेवले आहे. चालु वर्षीच्या टेनिस हंगामात अमेरिकेच्या मॅडिसन किजने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम तर कोको गॉफने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे. 23 वर्षीय अॅनिसिमोव्हाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. या उपांत्य फेरीच्या सामन्यात अॅनिसिमोव्हाने पहिल्या सेटमध्ये आपल्या वेगवान सर्व्हिसवर प्रत्येक गुण घेण्यासाठी झगडत होती. तर या सेटमध्ये साबालेंकाकडून दुहेरी चुका झाल्याने तिला हा सेट गमवावा लागला. या सेटमध्ये अॅनिसिमोव्हाने साबालेंकावर 4-3 अशी आघाडी घेतली होती. अॅनिसिमोव्हाने हा सेट 6-4 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये साबालेंकाने आपल्या डावपेचामध्ये बदल करत आक्रमक फोरहॅन्ड फटके आणि वेगवान सर्व्हिसवर अधिक भर दिला. अॅनिसिमोव्हाला हा सेट 4-6 असा गमवावा लागला. साबालेंकाने दुसरा सेट जिंकून अॅनिसिमोव्हाशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. पण अॅनिसिमोव्हाने बेसलाईन खेळावर अधिक भर देत साबालेंकाला नेटजवळ वारंवार खेचल्याने तिच्याकडून चुका झाल्या. या शेवटच्या सेटमध्ये साबालेंकाने दोनवेळा आपली सर्व्हिस गमविली. अखेर अॅनिसिमोव्हाने हा शेवटचा सेट 6-4 असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अॅनिसिमोव्हाने अंतिम फेरी गाठली आहे. बेलारुसच्या साबालेंकाला चालु वर्षीच्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. विम्बल्डनमध्ये तिचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. 2014-15 साली अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने चारही ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. 2023 मध्ये अॅनिसिमोव्हाला प्रकृती नादुरुस्तीमुळे आठ महिने टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते. पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत अॅनिसिमोव्हा पहिल्या 10 खेळाडूंत स्थान मिळवेल. अॅनिसिमोव्हा आणि साबालेंका यांच्यात आतापर्यंत 9 लढती झाल्या असून त्यापैकी 6 लढती साबालेंकाने गमविल्या आहेत.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने स्वीसच्या 35 व्या मानांकीत बेलिंडा बेन्सिकचे आव्हान सरळ सेटमध्ये संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. स्वायटेकने बेन्सिकचा 71 मिनिटांच्या कालावधीत 6-2, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. पोलंडच्या स्वायटेकला यापूर्वी विम्बल्डन स्पर्धेत एकदाही उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नव्हती. दोन आठवड्यापूर्वी स्वायटेकने हॅमबुर्ग ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. स्वायटेकला अद्याप एकही ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविता आलेले नाही.

 सिनियाकोव्हा-वर्बीक विजेते

झेकची 29 वर्षीय कॅटरिना सिनियाकोव्हा आणि नेदरलँडसचा वर्बीक यांनी मिश्रदुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ब्रिटनच्या सॅलीसबेरी आणि ब्राझीलच्या स्टिफेनी यांचा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सिनियाकोव्हा आणि वर्बीक यांनी सॅलिसबेरी व स्टिफेनी यांचा 7-6 (7-3), 7-6 (7-3) असा पराभव केला.  सिनियाकोव्हाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत महिला दुहेरीतील 10 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. चालु वर्षीच्या टेनिस हंगामात तिने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अमेरिकेच्या टाऊनसेंड समवेत विजेतेपद मिळविले होते.

Advertisement
Tags :

.