डेव्हिडोविच फोकिना-डी मिनॉर यांच्यात अंतिम लढत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या डीसी खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अॅलेजेंड्रो फोकिना आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा मानांकित अॅलेक्स डी मिनॉर यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. फोकिनाने अमेरिकेच्या शेल्टनचा तर डी मिनॉरने कोरेन्टीन मॉटेटचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या बाराव्या मानांकित फोकिनाने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित बेन शेल्टनचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता एटीपी टूरवरील स्पर्धेत फोकिना चालू वर्षीच्या टेनिस हंगामात पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सातव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने कोरेनटीन मॉटेटचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 2025 च्या टेनिस हंगामात हार्डकोर्टवरील स्पर्धेतील मिनॉरचा हा विसावा विजय आहे. डी मिनॉरने या स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. 2018 साली डी मिनॉरने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती पण जर्मनीच्या व्हेरेव्हने त्याला पराभूत केल्याने मिनॉरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.