जिल्ह्यातील मतदारांची संख्या 12 लाख 7 हजार 433
कारवार : कारवार जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. अंतिम यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 12 लाख 7 हजार 433 इतकी आहे. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 6 लाख 4 हजार 466 इतकी तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 2 हजार 961 इतकी आहे. अन्य मतदारांची संख्या 6 इतकी असल्याची माहिती कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी दिली. त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना मतदार याद्यांचे वितरण करून बोलताना पुढे म्हणाल्या, 27-10-2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 11 लाख 98 हजार 532 इतकी होती. 1-1-2024 रोजी अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार या संख्येत 8 हजार 901 इतकी भर पडली असून आता मतदारांची संख्या 12 लाख 7 हजार 433 इतकी झाली आहे. 2024 लोकसभा निवडणूक संदर्भात जिल्ह्यातील ज्येष्ठ मतदारांची संख्या 29 हजार 229, युवा मतदारांची संख्या 24 हजार 399 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 15 हजार 579 इतकी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 445 कंट्रोल युनिट, 2756 बॅलेट युनिट आणि 2035 व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश राजपूत, असिस्टंट कमीशनर कनिष्क, काँग्रेसचे नेते समीर नाईक आणि भाजपचे मनोज भट उपस्थित होते.