गजाननराव भातकांडे-एम.व्ही.हेरवाडकर यांच्यात आज अंतिम लढत
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 34 व्या दासाप्पा शानभाग चषक 16 वर्षाखालील मुलांच्या आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात गजाननराव भांतकांडेने ठळकवाडीचा तर एम.व्ही. हेरवाडकरने सेंटपॉल संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिद्धांत मेनसे व सुमित भोसले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात एम.व्ही. हेरवाडकर शालेय संघाने बलाढ्या सेंटपॉल शालेय संघाचा 14 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.
प्रथम फलंदाजी करताना हेरवाडकर शालेय संघाने 25 षटकात सर्वबाद 146 धावा केल्या. विराज माळवी 4 चौकार 1 षटकार 38, सुजल इडली 29, लक्ष खतायत 17, आदित्य जाधव 16 धावा केल्या. सेंटपॉल संघातर्फे समर्थ करडीने 5 गडी तर स्वरूप साळुंखेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंटपॉल शालेय संघाने 24.1 षटकात सर्वबाद 132 धावा केल्या. सिद्धांत करडीने एकाकी लढत देत 13 चौकार 1 षटकारासह 86 धावा केल्या. सोहम चव्हाणने 18, साईराज साळुंखेने 16 धावा केल्या. हेरवाडकर संघातर्फे सिद्धांत मेणसेने 4, आदित्य जाधवने 3 तर मंथन माईनकरने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात भातकांडे शालेय संघाने ठळकवाडी शालेय संघाचा 20 चेंडू व 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना ठळकवाडी शालेय संघाने 25 षटकात 6 बाद 169 धावा केल्या. प्रज्योत उघाडेने 6 चौकारांसह 65, नागेश्वर बेनके 27, श्रेयस बस्तवाडकर 23, वेदांत पोटे 18, श्री उंद्रे 17 धावा केल्या. भातकांडे शालेय संघातर्फे मिर मिरजीने 2 तर मोहम्मद हमजा, स्वयं मोरे व सलमान धारवाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार सुमित भोसलेच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर भातकांडे शालेय संघाने आरामात विजय मिळविला. भातकांडेने 21.4 षटकात 1 गडी बाद 162 धावा जमवत सामना 9 गड्यांनी जिंकला. सुमितने 66 चेंडूत 10 चौकार व 7 षटकारांसह नाबाद 119 धावा केल्या. मीर मिरजीने 4 चौकारांसह 28 धावा जमवत सुमितला मोलाची साथ दिली. ठळकवाडी संघातर्फे प्रज्योत उघाडेने एक गडी बाद केला.