ड्रेपर-रुने यांच्यात अंतिम लढत
अल्कारेझ, मेदव्हेदेव यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
इंडियन वेल्स मास्टर्स पीएनबी पेरीबस 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने स्पेनच्या अनुभवी कार्लोस अल्कारेझचा तर डेन्मार्कच्या होल्गेर रुनेने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा उपांत्य फेरीत पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने स्पेनच्या अल्कारेझचा 6-1, 0-6, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अलिकडच्या कालावधीत ड्रेपरने एटीपीच्या पाठोपाठ झालेल्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली असून त्याने आता पहिल्यांदाच एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 10 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत ड्रेपरला पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील अल्कारेझ विरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले होते. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या कतार खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेत रशियाच्या रुबलेव्हने ड्रेपरचा अंतिम सामन्यात पराभव करुन जेतेपद मिळविले होते. एटीपी टूरवरील मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेमध्ये ड्रेपरने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. ड्रेपरला अंतिम फेरीत डेन्मार्कच्या होल्गेर रुनेशी लढत द्यावी लागेल.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात डेन्मार्कच्या रुनेने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचे आव्हान 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये रुनेने दोन वेळेला मेदव्हेदेवची सर्व्हिस भेदली. पहिल्या सेटच्या तुलनेत दुसऱ्या सेटमध्ये रुनेला मेदव्हेदेवकडून म्हणावा तसा कडवा प्रतिकार झाला नाही. या सेटमध्ये रुनेने मेदव्हेदेवला केवळ 4 गेम्स जिंकण्याची संधी दिली. अखेर फोरहँड फटक्यावर रुनेने आपला शानदार विजय नोंदविला.