For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्रनगरी सुसज्ज,पण 'कनेक्टिव्हिटी'चे काय?

03:02 PM Jun 30, 2025 IST | Radhika Patil
चित्रनगरी सुसज्ज पण  कनेक्टिव्हिटी चे काय
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे :

Advertisement

कोल्हापूरची चित्रनगरी एकेकाळी कलापंढरी म्हणून ओळखली जायची, परंतु मुंबई-पुण्यामध्ये चित्रनगरी झाल्यानंतर कोल्हापुरातील सर्वच चित्रीकरण मुंबई-पुण्याकडे वळले. सातारा, कोकण, गोवा भागातही अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण होते आहे, परतुं कोल्हापुरात चित्रिकरणासाठी अनेक स्पॉट असूनही निर्माते, दिग्दर्शक कोल्हापूरला वगळत आहेत. परिणामी, स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, केशभूषा, वेशभूषाकारांना रोजगार मिळत नाही, चित्रनगरीत नवीन स्पॉट उभारले जात आहेत. चित्रनगरी सुसज्ज बनत असली तरी कनेक्टव्हिटीचे काय, हा प्रश्न आहे. कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सोडवल्यास चित्रनगरी बहरणार आहे.

मुंबई-पुण्यातून कोल्हापूरला चित्रिकरणासाठी पूर्वी कलाकारांना रस्त्याने किंवा रेल्वेने यावे लागत होते. यामध्ये भरपूर वेळ जात असल्याने पुढील चित्रिकरणासाठी ते वेळेत पोहोचू शकत नसल्याचा सूर स्टार कलाकारांचा होता. सध्या कोल्हापूरातून रोज मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, तिरूपती हवाई मार्गावर विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे कलाकार एका दिवसात कोल्हापूरला चित्रिकरणासाठी येऊन जाऊ शकतात. रोज मुंबईला जाण्यासाठी रेल्वेसह एसटी बसचीही सुविधा आहे. आता दळणवळणाची सुविधा वाढल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला आहे.

Advertisement

कोल्हापुरातील चित्रनगरीत नुसत्या इमारती उभारून चालणार नाहीत तर अन्य प्राथमिक सोयी-सुविधा देण्याची गरज आहे. स्टार कलाकार आला तर त्यांना राहण्यासाठी व्यवस्था नाही. वसतिगृह असले तर बेडची कमतरता आहे. मोठी मालिका किंवा चित्रपट यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक सुविधा येथे असणे गरजेचे आहे.

कोल्हापुरात चांगले तंत्रज्ञ आहेत, परंतु बदलत्या तंत्रज्ञानानुसार चित्रनगरीत तांत्रिक सुविधांची कमतरता जाणवते, अशी या क्षेत्रातील काही कलाकारांची खंत आहे. त्यांच्यापर्यंत नव्याने झालेल्या सुविधांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे.

चित्रनगरीमध्ये चित्रिकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक रेल्वे स्टेशन, वाडा, चाळ, मंदिर उभारले आहे. परंतु या सेटमध्ये रेल्वे डबे, वाड्यात मेकअप रूम आणि चाळीमध्ये दुकानगाळे, त्यामध्ये लागणाऱ्या सुविधांसाठी आणखी निधीची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांची मागणी आहे.

चित्रनगरीमध्ये चित्रपट व्यवसायाची समज असलेली व्यक्ती कायमस्वरूपी उपलब्ध असावी. व्यवसाय, सोयी-सुविधा लक्षात घेऊन येथील चित्रिकरणाचे दर परवडणारे असावेत. चित्रनगरीतील अपूर्ण सेट त्वरीत पूर्ण करून मिळावेत. चित्रनगरीचे पर्यटनस्थळ न करता चित्रिकरणासाठी सोयी उपलब्ध कराव्यात जेणेकरून चित्रनगरीच्या उत्पन्नाची कोल्हापूरमधील व्यवसाय वाढीस मदत होईल. सध्या उपलब्ध दोन्ही फ्लोअर चित्रिकरणासाठी दिले आहेत. त्यामुळे ९० बाय १०० फुटांचे आणखी २ फ्लोअर व १०० बाय १५० फुटांचे दोन फ्लोअर बांधून मिळावेत. अद्ययावत कॅन्टीन, रेस्टारंट सेट लवकर मिळावा. एअरपोर्ट अथॉरिटीच्या नियमानुसार जेथे बांधकाम करता येत नाही अशा भागात गार्डन आणि जंगल उपलब्ध करावे. चित्रपट क्षेत्रातील स्थानिक अनुभवींना विश्वासात घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार सेटची बांधणी करावी. यासह अन्य सुविधा दिल्या तरच चित्रपट, मालिकांचे चित्रिकरण कोल्हापूरात पुन्हा होण्यास मदत होईल, असे स्थानिक कलाकारांचे मत आहे.

  • प्राथमिक सुविधांअभावी इतर जिल्ह्यांकडे शुटिंगसाठी कल

कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, खिद्रापूर, आदमापूर, कणेरीमठ अशी धार्मिक स्थळे आहेत. पन्हाळा, मसाई पठार, आंबोली, राऊतवाडी, राधानगरी, बर्की, दाजीपूर, चांदोली, भुदरगड, रांगणा, विशाळगड आदी पर्यटन स्थळे चित्रिकरणासाठी उपलब्ध आहेत. तरीदेखील पुरेशा प्राथमिक सुविधा नसल्या कारणाने निर्मार्त, दिग्दर्शक मालिका, चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी इतर जिल्हा आणि राज्याची निवड करत आहेत.

  • स्थानिक चित्रपट व्यवसायिकांना विश्वासात घेऊन चित्रनगरीचा विकास करावा

चित्रनगरीच्या विकासासाठी काय सुविधा हव्या, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील लोकांची समितीत निवड केली जाते. परिणामी, उबल खर्च करण्याची वेळ चित्रनगरी प्रशासनावर अनेकदा आली आहे. त्यामुळे नुसत्या इमारती उभारून चालणार नाही. संचालनालयाने प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात त्यासाठी स्थानिक चित्रपट व्यवसायिकांना विश्वासात घेऊन विकास करावा. - आनंद काळे, अभिनेता

  • मुंबईनंतर कोल्हापुरातील चित्रनगरी चित्रिकरणाचा स्पॉट करण्याचा प्रयत्न

मुंबईनंतर कोल्हापूर चित्रिकरणाचा स्पॉट करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहेत. कोल्हापुरातील स्थानिक कलाकारांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. चित्रनगरी नुसती चित्रिकरणासाठी मर्यादीत न ठेवता एक पर्यटन स्थळ बनवण्याचा मानस आहे.

                                                                                    - अॅङ आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री

Advertisement
Tags :

.