प्रक्षोभक-आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
एस.डी.पी.आय.च्या नेत्यांविरोधात भटकळ भाजपची मागणी
कारवार : प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह घोषणांद्वारे समाजातील शांततेला सुरूंग आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या एस.डी.पी.आय.च्या नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी भटकळ भाजपतर्फे भटकळचे सीपीआयकडे करण्यात आली आहे. सीपीआय गोपाळकृष्ण यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 6 नोव्हेंबर रोजी भटकळ ता. पं. कार्यालयासमोर एस.डी.पी.आय.तर्फे निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनात एसडीपीआयचे नेते तौफीक बॅरी, वासीम मणेगारसह 50 कार्यकर्ते सहभागी होते.
निदर्शने आंदोलन छेडल्याबद्दल आपले काही एक म्हणणे नाही. कारण लोकशाहीने आंदोलन छेडण्याला प्रत्येकाला हक्क दिला आहे. तथापी 6 नोव्हेंबर रोजी छेडलेल्या निदर्शने आंदोलनावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर, संघ परिवार, देशभक्ती संघटना आणि व्यक्तींच्या विरोधात प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. शिवाय आक्षेपार्ह भाषणेही करण्यात आली. प्रक्षोभक घोषणांमुळे समाजातील शांततेला सुरुंग आणि दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता बॅरी, मणेगार आणि आंदोलनात सहभागी झालेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना भटकळ तालुका भाजप मंडळ अध्यक्ष लक्ष्मीनारायण नाईक, पदाधिकारी, हिंदू नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.