ऋषभ, त्याच्या आईवर गुन्हा दाखल करा
धारगळ अॅसिड हल्ल्यातील संशयिताच्या पत्नीची मागणी : दोघांचे आक्षेपार्ह फोटो, चॅटिंगचे पोलिसांना दिले पुरावे
दोडामार्ग : धारगळ येथे ऋषभ उमेश शेट्यो या महाविद्यालयीन युवकावर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात कळणे दोडामार्ग येथील मुलीच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ पाठवून सदर जखमी मुलगा व त्याची आई ब्लॅकमेल करीत होती आणि त्या नैराश्येतूनच आपल्या मुलीने आत्महत्या केली. त्यामुळे या दोघांवरही माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे निवेदन अॅसिड हल्लाप्रकरणी गोवा पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित नीलेश देसाई याच्या पत्नीने दोडामार्ग पोलिसांना दिले आहे. शिवाय आपल्या पतीला केवळ संशयावरून अटक केल्याचा दावाही तिने केला आहे. मुलीच्या आईने दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपली मुलगी गोव्यातील म्हापसा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिचे तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या धारगळ येथील अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या (ऋषभ) मुलासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणे सुरू होते. मुलीला त्याने विवाहाचे आमिष दाखविले होते. त्यानेच तिच्यासोबतचे फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतले होते. या सर्वांची कल्पना त्या मुलाच्या आईला होती.
मुलाची आई मुलाला सामील?
7 मे 2025 रोजी आमची मुलगी त्या मुलाच्या घरी गेली होती. त्यावेळी त्या मुलाच्या आईने आमच्या मुलीशी उद्धट वर्तन करून शिवीगाळ केली. तसेच यापुढे माझ्या मुलाशी कोणताही प्रेमसंबंध ठेवायचा नाही. तुमच्या आणि आमच्या कुटुंबाची तुलना होऊ शकत नाही. तसेच आमच्या मुलाचा नाद सोड. नाहीतर जीव दे. तसेच तू तुझ्या जिवाचे बरे वाईट केल्यास आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार आहे. तसेच प्रेमसंबंध ठेवल्यास तुझे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करू, अशी धमकी दिली होती.
मुलगी सापडली होती कात्रित
दुसऱ्या बाजूने त्या मुलाने सांगितले की, माझ्या आईचा विरोध असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मात्र, तुझे व्हिडिओ माझ्याकडे असून तुला माझ्याशी संबंध ठेवावे लागतील. त्यामुळे आमची मुलगी विचित्र कात्रीत सापडली होती. हा सर्व प्रकार पाहता त्या मुलाने व त्याच्या आईने आमच्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडले होते, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.
नैराश्यातून विष प्राशन
8 मे 2025 रोजी आमची मुलगी दोडामार्ग येथे ब्युटिपार्लरच्या कोर्सला आली होती. दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास तिने नैराश्यातून विष प्राशन केले. त्यावेळी तिला मोरगाव-दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर एका खासगी डॉक्टरकडे आणि तेथून म्हापसा आझिलो रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान 21 मे रोजी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांना बंद लखोट्यातून दिले फोटो
यावेळी कुटुंबियांनी त्या मुलाचे व आपल्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो पोलिसांना बंद लखोट्यातून दिले. त्या फोटोतून बरेच काही सिद्ध होत आहे. शिवाय त्या मुलाच्या आईने व मुलाने आमच्या मुलीचा केलेल्या छळवणुकीला कंटाळूनच हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आमची मुलगी अल्पवयीन असल्याने त्या मुलाच्या आईवर व मुलावरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. निरीक्षक खोपडे म्हणाले की, तुमच्या मागणीच्या अनुषंगाने आपण वरिष्ठांकडून या संदर्भात मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, अॅड. विश्राम घोगळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, सरपंच अजित देसाई, संदेश देसाई, सचिन देसाई, भिवा गवस यांच्यासह कळणे ग्रामस्थ उपस्थित होते.
संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी
धारगळ येथे कॉलेजवयीन ऋषभ उमेश शेट्यो (17) याच्यावर अॅसिड हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयित आरोपी नीलेश देसाई (46,रा. डबीवाडी, कळणे-दोडामार्ग) याला पणजी बाल न्यायालयाने गुऊवारी चार दिवसांची पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे. दरम्यान ऋषभ याच्यावर अजूनही गोमेकॉत उपचार सुऊ आहेत.